Solar Panel Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi : दीड मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी 10 कोटींची गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईबाबा संस्थानने १० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ११ कोटी रुपये खर्च असलेला ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्रकल्प व त्यातून दररोज दीड मेगावॅट निर्मिती करण्यासाठी रूफ टॉप सोलार प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तिरुपती बालाजी देवस्थाननंतर शिर्डी येथील साई संस्थान विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेले दुसऱ्या क्रमांकाचे ठरणार आहे. साई संस्थानचे मोठमोठे प्रसादलाय व भक्तनिवास असून त्यावर त्यांच्या छतावर ही सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती केली जाणार आहे.

देशात शिर्डी हे सर्वाधिक भक्तांच्या गर्दीचे देवस्थान आहे. येथे दररोज येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा पुरवताना वीज बिल व इंधनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. यावर उपाय म्हणून संस्थानने सुपा (ता. पारनेर, जि. नगर) येथे १५ कोटी खर्च करून २००७ मध्ये २.५ मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पातून २००७ पासून आतापर्यंत ६ कोटी ९६ लाख २७ हजार युनिट वीज निर्माण केली आहे. त्यातून संस्थानला २ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्याचप्रमाणे साई प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी प्रसाद भोजन, नाश्ता पाकिटे, लाडू प्रसाद बनवण्यासाठी एलपीजी गॅसचा इंधन म्हणून वापर होत होता. त्यासाठी ५५० मेट्रिक टन गॅस लागत होता.

संस्थानने खर्चाची बचत व्हावी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आशियातील सर्वात मोठ्या साई प्रसादालय या देशातील सर्वांत मोठ्या  प्रसादालयाच्या ११६८ चौरस मीटर छतावर १ कोटी ३३ लाख खर्च करून स्वयंचलित सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. यामुळे वर्षाकाठी १२८ मेट्रिक टन इंधन गॅसची बचत होऊन १ कोटी रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दिशादर्शक व फायदेशीर ठरला आहे. त्यानंतर आता साई संस्थानच्या विविध भक्तनिवासांच्या छतावर रूफ टॉप सोलार सिस्टिम प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास साई संस्थान रोज दीड मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. या अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरण संरक्षण होणार आहे. तसेच संस्थानचा इंधन व विजेवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे.