नाशिक (Nashik) : भारतातील ट्रॅव्हल लगेज उद्योग पुढील दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही बाब गृहित धरून इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये लाइफस्टाइल बॅग आणि ट्रॅव्हल लगेज उत्पादक सॅमसोनाइट साऊथ एशिया या कंपनीने प्रकल्प विस्ताराची घोषणा केली आहे. कंपनी दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष व नाशिकप्रकल्पाचे प्रमुख यशवंत सिंग यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी एबीबी या बहुराष्ट्रीय कंपनीनेही नाशिकमध्ये प्रकल्प विस्ताराची घोषणा केली आहे.
नाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड या दोन औद्योगिक वसाहती नाशिक महापालिका हद्दीत असून इगतपुरी, सिन्नर व दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमध्येही उद्योगांची संख्या चांगली आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये मागील वर्षभरात जवळपास सात हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. यामुळे नाशिकमधील उद्योगवाढीला चालना मिळत असल्याचे दिसत आहे. सॅमसोनाइट कंपनीचा प्रकल्प इगतपुरी तालुक्यात मुंबई- आग्रा महामार्गावर गोंदे येथे आहे.
कंपनीच्या लाइफस्टाइल बॅग आणि ट्रॅव्हल लगेजला भारतासह दक्षिण आशियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने येथील प्रकल्पात विस्ताराची योजना आखली आहे. त्यानुसार कंपनीने कामगार संघटनांबरोबर करारही केला आहे. त्यानंतर या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. सॅमसोनाइटच्या गोंदे येथील प्रकल्पातून वर्षाला पाच लाख बॅगा तयार होतात. विस्तारानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस ही क्षमता ७.५ लाख होणार आहे. त्यानंतर ही क्षमता वर्षाला दहा लाख बॅगा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी गोंदे येथील प्रकल्पात एक लाख ८० हजार चौरसफूट बांधकाम करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. हे बांधकाम या वर्षांच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. हार्डलगेज उत्पादन क्षमतेसाठी १२५ ते १५० कोटींची गुंतवणूक केली जाईल. स्वयंचलित गुदामांसाठी ५० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे नियोजन आहे.
सॅमसोनाइट कंपनीने आपल्या उत्पादनांची निर्यात करण्याबरोबरच भारतातही वितरण व्यवस्था विस्ताराची योजना तयार केली आहे. त्यानुसार अलीकडेच बिहारमधील दरभंगा येथे एक किरकोळ आउटलेट उघडले आहे. तसेच बिहारमध्ये कटिहार आणि मुझफ्फरपूर येथेही स्टोअर सुरू करण्याची योजना आहे. याद्वारे कंपनीच्या मालकीच्या स्टोअरची संख्या ६५ पर्यंत जाईल. भारतातील ट्रॅव्हल लगेज उद्योग पुढील दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यादृष्टीने या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सॅमसोनाइटने विस्ताराचे धोरण आखले आहे.