Property Tax Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : रतन इंडियाने थकविले गुळवंच ग्रामपंचायतीचे 17 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या सेझमधील सिन्नर थर्मल पावर लिमिटेड (रतन इंडिया पॉवर) कंपनीला गुळवंच ग्रामपंचायतीने मालमत्ताकर भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. या कंपनीकडे बांधकामावरील तीन कोटी ८१ लाख १७ हजार २३२ व बहुउद्देशीय भूखंडाकरता १३ कोटी २५ लाख ८१ हजार ७६१ असा १७ कोटी सहा लाख ९८ हजार ९९३ रुपये मालमत्ता कर थकीत आहे.

दरम्यान कंपनीवर बँकांचे कर्ज आहे. सद्यस्थितीत प्रकरण न्यायालयात असून कंपनी आर्थिक अडचणीत असल्याचे उत्तर ग्रामपंचायतीला कळवण्यात आले आहे. त्यामुळे लगेचच कर जमा होईल, याची शक्यताही कमीच आहे. अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात औद्योगिक विकासासाठी सिन्नरजवळील गुळवंच व मुसळगाव येथे २००६ मध्ये 'सेझ' निर्मितीचा निर्णय झाला. शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गुळवंच आणि मुसळगावच्या शिवारात सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांकडून खरेदी केले.

मात्र, गेल्या १८ वर्षांपासून जमीन पडीक आहे. त्याठिकाणी कोणतेही मोठे उद्योग उभे न राहिल्याने सेझच्या मुसळगावच्या ८९ शेतकऱ्यांकडून ४१८.०२ हेक्टर व गुळवंचच्या १९८ शेतकऱ्यांकडून ९७६.१५ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने संपादित केले. मुसळगावच्या शेतकऱ्यांना १८ वर्षांपूर्वी १७ कोटी पाच लाख रुपये, तर गुळवंच येथील शेतकऱ्यांना ४२ कोटी १४ लाख असा ६० कोटी रुपयांचा मोबदला दिला. शासनाने १४०० हेक्टरपैकी एमआयडीसीच्या माध्यमातून औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी ९०० हेक्टर जमीन भाडेतत्वावर दिली आहे. सध्या या सेझमधील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद असून तेथे इतर कोणतेही प्रकल्प सुरू नाहीत. यामुळे या कंपनीकडून वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीला मालमत्ता कर भरलेलो नाही. यामुळे ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे यांनी सिन्नर थर्मल पॉवर कंपनीला मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावली आहे.

कंपनीकहे सहा वर्षांपासून मालमत्ताकर थकीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने चार वर्षांपूर्वी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर २३ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला, तर कर मिळण्याबाबत कंपनीविरोधात लोकन्यायालयात प्रकरण नेण्यात आले होते. यावेळी कंपनीने केवळ पाच लाख रुपये भरले, त्यानंतरही कंपनीकडे १७ कोटींहून अधिक रकमेचा कर प्रलंबित आहे. ग्रामपंचायतीने औद्योगिक विकास महामंडळाला याबाबत कळविले होते. त्यानंतर महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ दोन अंतर्गत कर देय असून तो भरण्याची सूचना सिन्नर थर्मल पॉवर कंपनीला केली आहे. दरम्यान कंपनी आर्थिक अडचणीत असल्यामुळे या नोटीशीतून किती करभरणा केला जाईल, याची साशंकता आहे.