पुणे (Pune) : पुणे ते नाशिक असा प्रवास कराव्या लागणाऱ्यांसाठी एक 'गुड न्यूज' आहे. हा प्रवास आता अवघ्या पावणे दोन तासांत पूर्ण करण्याचे अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारच्या नीती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. तसेच प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या वीस टक्के रक्कम केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार आहे.
दरम्यान, गुरुवारी पुन्हा रेल्वे मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला रेल्वे कार्पोरेशनचे संचालक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत या प्रकल्पाला नीती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली. त्यामुळे या प्रकल्प मार्गी लागण्यात मोठा अडथळा दूर झाला आहे.
दृष्टीक्षेपात प्रकल्प
- रेल्वे पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार
- पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार
- प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च
- प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कार्पोरेशनच्या वतीने हाती
- प्रत्येकी वीस टक्के खर्च हा राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार
- उर्वरित ६० टक्के निधी कर्ज रूपाने उभारण्यात येणार
- त्यापैकी वीस टक्के निधीला राज्य सरकारकडून यापूर्वीच मान्यता
- केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून वीस टक्के निधी देण्याबाबत अद्याप मान्यता मिळाली नव्हती
- मागील वर्षी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पात तत्त्वतः मान्यता
विकासाला चालना
- पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यातून रेल्वेमार्गासाठी ५७५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार
- भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाकडून यापूर्वी प्रस्ताव दाखल
- त्यावर कार्यवाही सुरू
- पुणे जिल्ह्यातील ५७५ हेक्टर जमिनीसाठी १३०० ते १५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता
- थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार
- नारायणगाव, मंचर, चाकण यामार्गाने ही रेल्वे जाणार असल्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार
प्रकल्पाची वैशिष्टे
* पुणे नाशिक रेल्वे मार्ग २३५ किलोमीटर लांबीचा
* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
* रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग
* पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तासांवर येणार
* पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी
* प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा
अशी होणार वेळेची बचत
- पुण्यातून रेल्वे मार्गाने सध्या नाशिकला जाण्यासाठी सध्या दोन मार्ग कार्यरत होते
- त्यापैकी पुणे, दौंड-नगर, मनमाड आणि नाशिक असा एक मार्ग होता
- दुसरा मार्ग हा पुणे-लोणावळा, दिवा, इगतपुरी आणि नाशिक हा मार्ग होता
- या मार्गाने नाशिकला जात असताना सात ते आठ तास वेळ लागत होता
- तो आता पावणेदोन तासांवर येणार आहे