Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

तांबेंच्या निधीतून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी नवा मजला कोणासाठी?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नुकतेच मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या निवासस्थानावर एक मजला चढवून तिथे मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे.

या बांधकामामुळे गेल्या पंचवीस वर्षांपासून जतन करून ठेवलेले कुसुमाग्रजांचे निवासस्थान, वाचनालय व त्यांच्या वस्तू यांना धक्का लागणार आहे. यपूर्वी नाशिक महापालिकेने महापौर निधीतून हा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्याच मंडळींनी आमदार तांबे यांच्या माध्यमातून पुन्हा तोेच प्रयोग करण्याचा घाट घातल्याचे दिसत आहे. आमदारनिधीतील काम म्हणजे इस्टिमेट, टेंडर, वर्कऑर्डर आदी सरकारी छाप कामांमुळे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थाचे विद्रुपीकरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात गंगापूर रोडवर कुसुमाग्रज स्मारक आहे. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाच्या रचनेत बदल करण्यापेक्षा त्या स्मारकातच हे अभ्यासकेंद्र का उभारले जात नाही, असा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे.

क्रांतीचे गीत गाणारे कुसुमाग्रज यांच जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यिकांसाठी कुसुमाग्रजांचे निवासस्थान एक तीर्थक्षेत्र आहे. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानातील एका खोलीत त्यांच्या सर्व वस्तू ते हयात असतानाच्या स्वरूपात राखण्यात मूळ स्वरूपात असावी, अशीच राज्यातील कुसुमाग्रजप्रेमी आणि सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे. यामुळे कुसुमाग्रजांचे निवासस्थान मूळ स्वरुपात जतन व्हावे, ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींची इच्छा आहे. पण निवासस्थानाची जागा महापालिकेची असल्यामुळे महापालिकेतील सत्तेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही मंडळींच्या डोळ्यात ती जागा खूपत असल्याचे दिसत आहे. यामुळे दहा वर्षापूर्वी महापौर निधीतून ३१ लाख रुपये देऊन कुसुमाग्रजांच्या निवासस्थानातील वाचनालयावर एक मजला चढवून त्या निवासस्थानाचे विस्तारीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्या कामाचा प्रस्तावित आराखडाही तयार करण्यात आला होता.

त्यावेळी कुसुमाग्रजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केल्याचे तो प्रस्ताव मागे घेण्यात आला. आता दहा वर्षांनी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून भराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. या अभ्यासकेंद्रासाठी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानात बदल करून एक मजला बांधकाम केले जाणार आहे. युरोपमधील महान साहित्यिकांचे निवासस्थान, त्यांच्या वापरातील वस्तू यांचे शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आले आहे. यामुळे जगभरातून जाणाऱ्या पर्यटकांना ते आवर्जून दाखवले जाते. कुसुमाग्रजांनीही युरोपीयनांच्या या परंपरेचे त्यांच्या लेखनातून कौतुक केले आहे. त्यांच्या याच भावनेचा आदर करीत कुसुमाग्रजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तूंचे व निवासस्थानाचे जतन करण्यात आले आहे. मात्र, या मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या निमित्ताने होणाऱ्या बांधकामामुळे या निवासस्थानाचे विद्रुपीकरण होण्याचाच धोका अधिक आहे.

अभ्यास केंद्र स्मारकात का नाही?
नाशिकमधील गंगापूररोड परिसरात कुसुमाग्रज स्मारक असून तेथे वाचनालयासह इतर सुविधा आहेत. त्यामुळे तेथे दैनंदिन वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तेथे विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. या ठिकाणी मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारल्यास त्यातून नवीन पिढीमध्ये मराठी भाषा रुजवण्यासाठी  निश्‍चित उपयोग होऊ शकतो. मात्र, महापालिकेच्या माध्यमातून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी स्वतंत्र संस्थान उभे करण्याचा काही मंडळींचा हेतु असल्याची चर्चा आहे. या हेतुसाठी त्यांना तेथे नवीन बांधकाम करायचे आहे. मात्र, त्यांच्या या कृत्यामुळे कुसुाग्रजांच्या निवासस्थानाची जपणूक करण्याच्या मूळ हेतुला हरताळ फासला जात आहे.