नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या सेसनिधीमधून दीड कोटी रुपयांचे वैकुंठ रथ व एक कोटींचे भजन साहित्य खरेदी करण्यास मंजुरी दिल्यानंतर या खरेदीतून होणारी संभाव्य अनियिमतता व भविष्यात पंचायत राज समितीच्या सुनावणीच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी आता हे वैकुंठरथ व भजनसाहित्य पंचायत समिती पातळीवरून सरपंचांच्या समितीच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या खरेदीसाठी प्रत्येक गट व गणनिहाय समित्या तयार करून त्या समित्यांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची भूमिका केवळ या खरेदीनंतर पुरवठादारांच्या खात्यात निधी वर्ग करण्यापुरती मर्यादित राहणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतच्या फायलीवर सही केल्याने आता लवकरच गट व गणस्तरावर या साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. जिल्हापरिषदेच्या अंदाजपत्रकानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात इमारत व दळणवळण विभागाकडे साडेसहा कोटी रुपये सेसनिधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेला सेसनिधीतून वैकुंठ रथ व भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने सेसनिधीचे पुनर्विनियोजन करून त्यातील अडीच कोटी रुपयांचा निधी वैकुंठरथ व भजनीमंडळांना भजन साहित्य यासाठी वळवण्यास प्रशासकांनी मान्यता दिली.
या अडीच कोटीं रुपयांमधून दीड कोटी रुपयांच्या निधीतून ७२ जिल्हा परिेषद गटांना प्रत्येक एक याप्रमाणे वैकुंठ रथ खरेदी करण्यास सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सेसनिधीतून जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी भजन साहित्य खरेदी करण्याच्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रस्तावास मान्यता दिली. दरम्यान ग्रामविकास विभागाने सेसमधून कोणती कामे करता येऊ शकतात, याची यादी दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त कामे जिल्हा परिषदेस करता येत नाही. जिल्हा परिषदेस त्या यादीबाहेरील काम करायचे असल्यास ग्रामविकास विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. भजनी मंडळ साहित्य व वैकुंठरथ ट्रॉलीची खरेदी करणे हे विषय सेसमधील कामांच्या यादीमध्ये समावेश नाही. यामुळे या योजना राबवल्यास ती अनियमितता होऊ शकते, याची प्रशासनासमोर चिंता आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही वस्तुंचे पुरवठादार निश्चितीबाबतही दबाव असू शकतो, या कारणामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या दोन्ही वस्तुंच्या खरेदीसाठी टेंडर प्रकिया न राबवता गट व गणनिहाय सरपंचांच्या समित्या स्थापन करून त्या समित्यांच्या माध्यमातून या वस्तुंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या खरेदीत काही अनियमितता झाली, तरी त्याची जबाबदारी संबंधित समितीवर ढकलली जाईल व जिल्हा परिषद प्रशासनाला याचा काही त्रास होणार नाही, याची काळजी या निर्णयद्वारे घेण्यात आल्याचे दिसत आहे. या समितीने खरेदी कशी करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. वैकुंठरथाची खरेदी झाल्यानंतर त्याची देखभाल व त्याचा वापर याबाबत त्या गटातील २० ते २५ गावांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आली असती. मात्र, या समितीच्या माध्यमातून ही खरेदी होणार असल्याने भविष्यातील समस्यांमधूनही जिल्हा परिषदेने स्वताची सुटका करून घेतली आहे.
अशी होणार खरेदी...
जिल्हा परिषदेच्या ७२ गटांमध्ये ७२ वैकुंठरथ खरेदी केले जाणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठी त्या गटातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचांची मिळून समिती स्थापन केली जाईल. ग्रामविस्तार अधिकारी त्या समितीचे सचिव असतील. या सरपंचांच्या समितीने मिळून वैकुंठ रथ खरेदी करायचा आहे. वैकुंठरथ खरेदी केल्यानंतर ग्रामपंचायत विभाग प्रत्येक वैकुंठरथासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमारे निधी संबंधित पुरवठादाराच्या खात्यात वर्ग करणार आहे. जिल्हा परिषदेच्या १४४ गणांमध्ये प्रत्येकी एक भजनसाहित्य सेस निधीमधून दिले जाणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक गणामधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून भजन साहित्य खरेदी केली जाईल. एका भजन साहित्यासाठी ५० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या खरेदीनंतर पुरवठादाराच्या खात्यात निधी वर्ग केला जाईल.