Nashik ZP CEO Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मनरेगा कामांचा 60:40 रेशो राखण्यासाठी झेडपी राजी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पालकमंत्री दादा भुसे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे करताना आधी अकुशल कामे करा, त्यानंतर कुशल कामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाला हे प्रमाण राखण्याची जाणीव झाली  आहे. यामुळे मिशन भगिरथसह इतर कामांचे ६०:४० चे प्रमाण राखण्यासाठी पावसाळ्यात फळबागा, विहीरी खोदणे, वृक्षलागवड करणे या कामांचा आधार घेण्यात येईल, असा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

रोजगार हमी योजनेची कामे करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून केवळ कुशल कामांना प्राधान्य दिले जात असल्याने कुशल व अकुशल कामांचे प्रमाण बिघडले आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले. यात पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या १०० मॉडेल स्कूलची कामे रोजगार हमीतून सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तसेच मिशन भगीरथमधून सुरू असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांचीही यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी पालकमंत्री यांनी रोजगार हमीची कामे करताना कुशल व अकुशलचे ६०: ४० चे प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या.

रोजगार हमीची कामे करताना आधी अकुशल कामांना प्राधान्य द्या, म्हणजे प्रमाण कायम राहील, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनांकडे गांभीर्याने न पाहणारे जिल्हा परिषद प्रशासन आता पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचना गांभीर्याने घेईल, असे बोलले जात असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी आता उर्वरित नऊ महिन्यांमध्ये अकुशल कामांना अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.श्रीमती मित्तल म्हणाल्या, पावसाळापूर्व काळात जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मिशन भगिरथ अंतर्गत ११३कामे पूर्ण केली असून पुढच्या काही दिवसांत १३७ कामे पूर्ण होतील. म्हणजे पावसाळ्यापूर्वी २५० कामे पूर्ण होणार आहेत. ही सर्व कामे ९०:१० या प्रमाणात करण्यात आली असून या कामांमुळे कुशल व अकुशल मध्ये निर्माण झालेली अकुशल कामांची ३० टक्के तूट भरून काढण्यासाठी पावसाळ्यात वृक्षलागवड, फळबागा, विहिरी खोदणे ही कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. नरेगा अंतर्गत एकूण २६२ प्रकारची कामे समाविष्ट असून या कामांचा आधार ६०:४० चे प्रमाण राखण्यासाठी घेण्यात येईल, असे श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

ग्रामपंचायत विभागाने यावर्षी २४ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून आत्तापर्यंत तीन लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती केली आहे. जिल्हा परिषदेने  नियोजित केलेली कामे बघता त्यासाठी ५८ लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करावा लागणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन सुरू केले आहे.