Nashik Z P Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक झेडपीत आता 'नंदूरबार पॅटर्न'; CEO मित्तल यांचा धडाका

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : कुपोषण (Malnutrition) निर्मूलनासाठी दरवर्षी महिला व बालविकास विभाग कोट्यवधी रुपये खर्च करतो. या योजनांचे फलित म्हणून दरवर्षी कुपोषित बालकांची संख्या कमी झाली, असे प्रशासन जाहीर करते. पण कुपोषण निर्मूलनची आकडेवारी जैसे थे असते. कुपोषण निर्मूलनासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा शोध घेतला जातो. आता जिल्हा परिषदेच्या (Nashik Z P) नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी स्तनपान पद्धतीमध्ये बदल करण्यातून कुपोषण निर्मितीचा नवा पर्याय राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आयआयटी-मुंबई यांच्या सितारा (SITARA - IIT Mumbai) संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमातून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात स्तनपान पद्धत बदलण्याच्या मार्गातून कुपोषण कमी केले असल्याने तोच नाशिक (Nashik) जिल्ह्यात राबवण्यासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात आठ तालुके आदिवासी बहुल आहे. या तालुक्यांमधील दुर्गम भाग, खरीप हंगामाव्यतिरिक्त शेती व रोजगार नसल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि शिक्षणाचा अभाव आदी कारणांमुळे या भागात कमी वजनाची, कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे असते. यामुळे बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जातात. त्यात गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते सहा वर्षांच्या बालकांसाठी विविध योजना राबवूनही कुपोषणाची परिस्थिती थोड्याफार फरकाने तशीच राहते. यासाठी केंद्र, राज्य व जिल्हा परिषद यांच्याकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.

नाशिक जिल्हा परिषदेत गेले दोन वर्षांपासून मूठभर पोषण ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतरही जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांच्या संख्येत फारसा फरक पडत नाही. यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून एक मूठ पोषण योजना राबवली जात आहे. त्यातून कुपोषित बालकांची  संख्या स्थिर राहिल्याने जिल्हा परिषदेने या योजनचो मोठा गाजावाजा केला. दरम्यान या महिन्यात अशिमा मित्तल यांनी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्या आयआयटी-मुंबई येथून शिकलेल्या असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत असल्याने त्यांनी कुपोषण निर्मूलनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआयटी-मुंबई या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सितारा य संस्थेकडून सामाजिक-आर्थिक समस्यांवर काम केले जात असते. त्या संस्थेने यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यातील कुपोषण समस्येचे निराकरण करण्यासाठी स्तनपानाच्या पद्धतीन काही बदल करण्याचे प्रयोग केले व त्यातून त्यांना यश मिळाले आहे. यामुळे श्रीमती मित्तल यांनी सितारा संस्थेशी संपर्क साधून त्यांच्यासोबत एक कार्यशाळा नुकतीच घेतली. या कार्यशाळेत त्यांनी त्यांची पद्धत समजू घेतली असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या कर्मचारी, अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

काय आहे नवी संकल्पना?
बाळ जन्माला आल्यानंतर आई त्याला स्तनपान करते. ही बाब अनादी काळापासून सुरू असल्याने ती सर्वांना माहित आहे, असे गृहित धरले जाते. पण चुकीच्या पद्धतीने होणारे स्तनपान बाळाच्या वाढीवर परिणाम करीत असते. यामुळे सितारा संस्थेने स्थानिक भाषेत समजतील असे व्हिडिओ तयार केले आहेत. ते व्हिडिओ स्तनदा व गरोदर मातांना दाखवून त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याशिवाय गरोदर माता, स्तनदा माता यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करून त्यांना योग्य तो पोषण आहार दिला जाणार आहे. यामुळे बालकांना मातेचे पुरेसे दूध मिळू शकेल. यासाठी गरोदरपणाासून पुढील हजार दिवस माता, बालक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून बाह्य आहारापेक्षा स्तनपानावर भर दिला जाणार आहे.

प्रत्येक माता आपल्या बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करते, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात ते खरे असेलच, असे नाही. यामुळे सितारा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कुपोषण अधिक असलेल्या भागात आम्ही ही पद्धत राबवणार आहोत.
- अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक