Nashik ZP News नाशिक : जिल्हा परिषदेच्या रस्ते कामांसाठी टेंडर (Tender) भरताना खोटी व बनावट कागदपत्र सादर करून टेंडर मिळवण्याचा प्रयत्न ठेकेदाराच्या (Conractor) अंगलट आला आहे.
या ठेकेदाराने यापूर्वीही अनेकदा हीच कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेकडून टेंडर मिळवल्याची तक्रार थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्यामुळे बांधकाम विभागाने त्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्या पडताळणीत कागदपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यामुळे टेंडर समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे व कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार या ठेकेदारास काळ्या यादीत टाकले आहे.
जिल्हा परिषदेत या प्रकारच्या तक्रारी झाल्या तरी संबंधित ठेकेदारास अपात्र ठरवून दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदारास टेंडर देऊन दिले जाते. मात्र, जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे खोटी कागदपत्रे जोडून टेंडर मिळवण्याच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एक मध्ये दिंडोरी तालुक्यातील वडनेर शिंदवड तिसगाव औताळे, आंबेवणी वरखेडा शिंदवड ते तिसगाव या ७० लाखांच्या रस्त्याचे टेंडर जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. या टेंडरमध्ये सहभागी होताना प्रतिक देशमुख या ठेकेदाराने जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जबलपूर (मध्य प्रदेश) येथील औद्योगिक वसाहत महामंडळ यांच्याकडे काम केल्याचे अनुभवाचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जोडले होते. त्याचप्रमाणे ५०० रुपयांच्या मुद्रांकावर सादर केलेली कागदपत्रे खरी असल्याचे सत्यपत्र जोडले होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून प्रतिक देशमुख या ठेकेदाराने टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याच मागणी केली होती.
त्या पत्रातील मागणीप्रमाणे बांधकाम विभागाकडून चौकशी सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून या ठेकेदाराने टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यांच्या पत्रानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांना कागदपत्रांची तपासणी करून बनावट कागदपत्र जोडलेल्या प्रतिक देशमुख या ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता यांनी जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना पत्र पाठवून टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत अहवाल मागवून घेतले.
संबंधित विभागांनी हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेले नसल्याचा अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी ठेकेदाराविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करून टेंडर समितीचे अध्यक्ष डॉ. अर्जुन गुंडे यांच्याकडे पाठवला. त्यानुसार प्रतिक देशमुख यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या सूचना तसेच शासन निर्णयानुसार खोटी कागदपत्र सादर केल्यास ठेकेदाराविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने ठेकेदाराने केवळ काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.