Digital School Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक ZP, मनपा 100 कोटींतून साकारणार मॉडेल शाळा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३२०० शाळांपैकी पहिल्यावर्षी १०० मॉडेल शाळा तयार करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेला दिले आहे. तसेच नाशिक महापालिकेच्या सर्व शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये रुपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्मार्टस्कूलसाठी स्मार्ट सिटी कंपनीचा निधी वापरला जाणार असून जिल्हा परिषदेच्या १०० मॉडेल स्कूलसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेचा निधी वापरला जाणार आहे.

महापालिकेच्या स्मार्टस्कूलसाठी ७० कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीकडून निधी उपलब्ध होणार आहेत, तर जिल्हा परिषदेच्या १०० मॉडेलस्कूलसाठीही रोजगार हमी, जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून जवळपास ४० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांनी १० ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील १०० शाळा मॉडेल करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिली होती. त्यामध्ये प्रामुख्याने शाळांना संरक्षक भिंत बांधणे, क्रीडांगण तयार करणे, शाळेसाठी इतर पायाभूत सुविधा उभारणे आदी कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय डिजिटल शाळा करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे आदी कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील सर्व शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचा आराखडा तयार केला असून आतापर्यंत ११ शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू असून मार्चपर्यंत सर्व शाळांना संरक्षक भिंत मिळू शकणार आहे.

पालकमंत्र्यांनी महिन्याने पुन्हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेताना पहिल्या वर्षी जिल्ह्यात १०० शाळा मॉडेल तयार करण्यावर भर दिला. यावेळी त्यांनी या शाळांना बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतींच्या कामांचा आढावा घेतानाच या शाळांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही चर्चा केली. यावेळी त्यांनी या मॉडेल शाळांमधील पायाभूत सुविधा बघून इतर शाळांनाही तशा सुविधा उभारण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देतानाच त्यांनी जिल्हा परिषदेने या मॉडेल शाळा उभारणीसाठी शिक्षण, बांधकाम व ग्रामपंचायत विभाग यांच्याशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना केली.

दरम्यान नाशिक महापालिकेतही त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचा आढावा घेतला. स्मार्ट स्कूल या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढेल, असा विश्‍वास पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या ६९ शाळांमध्ये ६५६ स्मार्ट वर्ग, ६९ प्रयोगशाळा उभारल्या जाणार असून त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ७०.३० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. स्मार्ट स्कूल या संकल्पनेचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले असून त्यांनी एका शाळेला भेट देत ही संकल्पना समजून घेतली.