नाशिक (Nashik) : नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) समृद्धी महामार्गाचे सिन्नर तालुक्यातील काम पूर्ण होऊन इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंत वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही तालुक्यांमध्ये समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज वाहतूक करताना या दोन्ही तालुक्यांमधील अनेक रस्ते नादुरुस्त् होऊन जवळपास १५ कोटींचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असूनही त्यांच्याकडून याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने या दोन्ही तालुक्यांमधील जवळपास ६० गावांमधील नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.
महाकाय महामार्गासाठी मोठा भरावा टाकण्यात येऊन त्यावर आठ पदरी मार्ग उभारण्यात आला आहे. यामुळे या कामासाठी मोठ्याप्रमाणावर गौणखनिजाचा वापर झाला. यामुळे ठेकेदार कंपन्यांनी सार्वजनिक व खासगी जमिनींवरून मोठ्याप्रमाणावर गौणखनिज उचलून महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या पाच किलोमीटरच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर तलावांची कामे करून दिली. गौणखनिज वाहतूक करण्यासाठी अवजड वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर झाल्यामुळे ग्रामीण रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून चार वर्षात अनेकदा वहिवाट रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत आवाज उठवण्यात आला. रस्ते नव्याने करून देण्याची मागणीही झाली. जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधून हा महामार्ग जातो. सिन्नर तालुक्यातील काम पूर्ण झाले असून इगतपुरी तालुक्यातील काही भागातील काम अंतिम टप्प्यात आहे.
सिन्नरचे काम पूर्ण झाल्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेऊन सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नादुरुस्त रस्त्यांबाबत अहवाल तयार करण्यात आला. यातील थोड्याफार रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. इतर रस्ते अद्यापही तसेच नादरुस्ती असताना संबंधित कंपनीने सर्व रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचा अहवाल दिला असल्याचे समजते. या रस्त्यांबाबत इगतपुरीमध्येही जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांनी नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र लिहिले आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील फांगूळगव्हाण, शेणवड ते खडकवाडी या रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी २०२१ मध्ये केली आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही कार्यवाही न केल्याने या भागातील नागरिकांना या खड्ड्यांच्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे दोन महिन्यांपूर्वी नागरिकांनी या नादुरुस्त रस्त्यांबाबत आंदोलन केले होते.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
सिन्नर तालुक्यात ५२ गावांमधील रस्त्यांचे या अवजड वाहनांमुळे १० कोटींचे नुकसान झाले असून इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांचेही जवळपास पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये निधी लागणार आहे. एरवी जिल्हा नियोजन समिती, बांधकाम विभाग अथवा ग्रामविकास विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी तत्पर असलेले लोकप्रतिनिधी समृद्धीमुळे नादरुस्त झालेल्या रस्त्यांसाठी पाठपुरावा करीत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिका पत्रव्यवहार करतात. या पत्रव्यवहाराला रस्ते विकास महामंडळाकडूनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा परिषदेकडून केवळ पत्रव्यवहार केला आहे, एवढेच उत्तर मिळत असते. या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.