Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर फिफ्टी’ उपक्रम; टेंडर...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ या अनुक्रमे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या ‘सुपर फिफ्टी’ उपक्रमासाठी एक कोटी ९० लाख ५७ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग व जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी मिळाला आहे. आता योजना राबवीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने त्यासाठी टेंडरदेखील प्रसिद्ध केले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांची दरवाजे खुली व्हावी, त्यासाठी सुपर ५० उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उपक्रमात वर्षभरात प्रतिविद्यार्थी सुमारे एक लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. गतवर्षी हा उपक्रम उपाध्ये क्लासेससोबत राबविण्यात आला होता. या उपक्रमाचा प्रतिसाद बघता गतवर्षी या उपक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या ११० करण्यात आली. गेल्या वर्षीही पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुन्हा निधी दिला होता. पहिल्या वर्षातील उपक्रमातील ५० पैकी २२ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण, तर सात विद्यार्थी चमकले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी या उपक्रमासाठी एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यातील ५५ जण ‘जेईई’ तर ५५ विद्यार्थी ‘नीट’साठी निवडण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण योजेनतून कोणत्याही उपक्रमाला केवळ दोनदा निधी देण्यात येतो. वारंवार निधी देता येत नाही. त्यामुळे या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात यंदा दीड कोटीची तरतूद केली होती. असे असतानाही जिल्हा नियोजन समितीकडे विविध लेखाशीर्षाखाली दोन कोटींच्या निधीची मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी आदिवासी, समाजकल्याण या विभागांतर्गत निधीची मागणी केली होती. त्यानुसार ‘समाजकल्याण’कडून २५ लाख ९९ हजार, आदिवासी विकास विभागांतर्गत ६९ लाख ३० हजार, जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाख २९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.