नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील आमदारांनी रोजगार हमी मंत्रालयातून मंजूर करून आणलेल्या १२५ कोटी रुपयांच्या १०८९ कुशल कामांचा समावेश रोजगार हमीच्या जिल्हा आराखड्यात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिक जिल्हा परिषदेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. अतिरिक्त कुशल कामांमुळे निर्माण होणारा रोजगार हमीच्या जिल्हा आराखड्यातील ताण कमी झाल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेने पुढील वर्षासाठी मिशन भगिरथ प्रयास या योजनेच्या नवीन आराखड्याच्या तयारीस सुरवात केली आहे. मागील वर्षी नाशिक जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून मिशन भगिरथ प्रयास ही योजना राबवून १६३ बंधारे उभारले आहेत. उर्वरित कामे आता वेगाने सुरू झाली आहेत.
जिल्हा परिषदेने या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून मिशन भगिरथ प्रयास ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून पहिल्या वर्षी ६१० बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील ३६५ बंधारे उभारण्यास मंजुरी देण्यात आली व त्यातील १५२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हा परिेषदेच्या ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी जिल्हा आराखड्यातील कामांचे कुशल व अकुशलचे प्रमाण निश्चित ठेवून आराखडा मंजूर केलेला आहे. मात्र, मिशन भगिरथमधील ११० कोटींचे बंधारे, मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील जवळपास चारशे कोटींची कामे व अतिरिक्त कुशलमधील १२५ कोटींची कामे ९५ टक्के कुशल व पाच टक्के अकुशल या प्रमाणे करण्याच्या कामांची त्यात भर पडली. यामुळे जिल्हयातील रोजगार हमीच्या योजनांच्या कामांचा ६०:४० चे प्रमाण धोक्यात आले.
अकुशल कामांचे कितीही प्रमाण वाढवले, तरी या ६०० कोटींच्या कुशल कामांची व अकुशल कामांशी सांगड घालणे जिल्हा परिषदेच्या आवाक्याबाहेरील गोष्ट होती. यामुळे पाणंद रस्ते असो वा अतिरिक्त कुशलची कामे यांना पंचायत समिती स्तरावरून कार्यारंभ आदेश दिले जात नव्हते. अखेरीस रोजगार हमी मंत्रालयाने जिल्हास्तरावरील रोजगार हमी आराखड्यातील ६०: ४० च्या प्रमाणात अतिरिक्त कुशल कामांचा समावेश करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जिल्हास्तरावरील रोजगार हमीच्या आराखडयावरील अतिरिक्त कुशल कामांचा बोजा कमी झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेने आता मिशन भगिरथची उरलेली कामे येत्या मार्चपर्यंत मार्गी लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षात मिशन भगिरथमधून आणखी कामांचे नियोजन करण्यासाठी जलसंधारण विभागाकडून सर्व्हे करून घेतला जात आहे.
१२५ कोटींची अतिरिक्त कुशल कामे
जिल्ह्यातील आमदारांनी रोजगार हमी मंत्रालयातून अतिरिक्त कुशलची १२५ कोटींची १०८९ कामे मंजूर करून आणली आहेत. या कामांना आता रोजगार हमीच्या ६०:४० च्या प्रमाणाचे बंधन उरलेले नाही.यामुळे ही कामे वेगाने सुरू असून जिल्हा परिषदेच्या मिशन भगिरथमधील बंधारे उभारण्याच्या कामालाही गती येणार आहे.