Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत नवीन जागेत स्थलांतरित करण्याची घाई का?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारतीचे तीन मजल्यांचे बांधकाम झाले असून उर्वरित तीन मजल्यांच्या कामाला मागील मार्चमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बांधकाम झालेल्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून फर्निचर करण्यासाठी निधी नाही. या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकरच जिल्हा परिषदेचे कार्यालये नवीन इमारतीत हलवण्याबाबत सुतोवाच केले आहे. मात्र, सध्या बांधकाम झालेल्या तीन मजल्यांवर सर्व कार्यालयांना जागा मिळू शकणार नाही. तसेच फर्निचर नसल्यामुळे नवीन ठिकाणी ही कार्यालये कशी हलवणार, असा प्रश्न असूनही मुख्यालय नवीन जागेत हलवण्याची घाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक जिल्हा परिषदेची सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्यामुळे २०१९ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या २५ कोटी खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर २०२० मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून जानेवारी २०२१ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला. दरम्यान काम सुरू केल्यानंतर नाशिक महापालिका व नगररचना विभागाच्या नियमानुसार इमारतीच्या बांधकामामध्ये काही बदल सुचवण्यास आले. यामुळे इमारतीच्या खर्चामध्ये वाढ होऊन तो ३९.६१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. सातपूर मार्गावर पशुसंवर्धन विभागाच्या जागेत या इमारतीच्या प्रस्तावित सहा मजल्यांपैकी सध्या दोन तळ मजले तीन मजले यांचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या रंगकाम सुरू आहे. दरम्यान या इमारतीच्या उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामासाठीही ग्रामविकास विभागाने ४१.६७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. दरम्यान काम पूर्ण झालेल्या तीन मजल्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालये हलवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन सुरू केले आहे. त्यांनी नुकतेच सर्व विभागप्रमुखांसह नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या तीन मजल्यांवर शक्य तितके कार्यालये सुरू करायची व साधारण वर्ष-दीड वर्षात उर्वरित तीन मजल्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कार्यालये तेथे स्थलांरित करायची, असे नियोजन आहे.

उद्घाटन कधी होणार?
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून तीन चार जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर शिक्षक आमदार निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन किमान दीड महिने आचारसंहिता लागू असणार आहे. यामुळे या नवीन इमारतीचे उदघाटन कधी होणार, असा प्रश्न असला, तरी या दोन निवडणुकांच्या मध्ये काही काळ आचारसंहिता नसल्याच्या काळात उद्घाटन उरकून घेण्याचा विचार असल्याचे दिसते. एकदा उद्घाटन झाले म्हणजे जिल्हा परिषदेची अधिकाधिक कार्यालये तेथे स्थलांतरित होतील, असे सांगितले जात आहे.

नवीन जागेत जाण्याच्या या आहेत अडचणी
* सध्या या नवीन इमारतीची रंगरंगोटी बाकी असून तेथे फर्निचरही नाही. फर्निचरशिवाय तेथे नवीन कार्यालये कसे सुरू होणार ?
* वरच्या तीन मजल्यांचे काम सुरू असताना नागरिकांना तसेच कर्मचारी यंना या नवीन इमारतीमध्ये ये जा करण्यात अडथळे येण्याची शक्यता.
* सध्याच्या तीन मजल्यांची जागा सर्व कार्यालयांसाठी अपुरी पडणार असल्याने काही कार्यालये जुन्याच इमारतीत ठेवावी लागतील. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात विस्कळितपणा येण्याचीही शक्यता आहे.