Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : जिल्हा परिषदेच्या निधी नियोजनासाठी अवघा 15 दिवसांचा वेळ

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला यंदाचे नियतव्यय मंजूर झाले आहे. लोकसभा व नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचीही आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी तत्काळ नियोजन करावे. ३१ जुलैपर्यंत विभागांनी नियोजन करून, निधीची मागणी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी विभागांना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल प्रदीर्घ रजेवर गेल्या असून, त्यांचा कार्यभार हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांच्यावर सोपविण्यात आला आहे. डॉ. गुंडे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेत कामकाजाला सुरवात केली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हजेरी लावल्यानंतर डॉ. गुंडे यांनी दालनात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत प्रामुख्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील निधी खर्चाचा आढावा झाला. आतापर्यंत ४६ टक्के निधी खर्च झाला असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. विभागनिहाय निधी खर्चाचा आढावा घेतला असता पिछाडीवर असलेल्या विभागांना डॉ. गुंडे यांनी तत्काळ निधी खर्चाच्या सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेचे नियतव्यय मंजूर झाले आहे. काही विभागांनी नियोजन केले आहे.

मात्र, अजूनही काही विभागांचे नियोजन झालेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागणार असल्याने निधी नियोजनासाठी कालावधी कमी आहे. प्रत्येक विभागांनी पंधरा दिवसांत निधीचे नियोजन करून निधीची मागणी करावी, असे निर्देश डॉ. गुंडे यांनी दिले. जेणेकरून प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश वेळात देता येईल. गतवर्षीचे राहिलेले कार्यारंभ आदेश तत्काळ द्यावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सुपर ११० उपक्रमातील विद्यार्थी नोंदणीबाबतही त्यांनी या वेळी आढावा घेतला. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.