Nashik ZP CEO Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : निर्मलवारीसाठी नाशिक झेडपीचा सहाकोटींचा आराखडा; अखेर प्रस्ताव मंत्रालयात

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी निर्मलवारी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेने ६.५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रुफ मंडप, भाविकांना पाणी पुरवण्यासाठी ६० टँकर, २५० फिरते शौचालय आदी बाबीचा समावेश केला आहे. या आराखड्यास ग्रामविकास मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर त्यानुसार दिंडी सोहळ्यात निर्मळवारीसाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकार अशिमा मित्तल यांनी दिली.

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरला आषाढीवारीसाठी जात असतात. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी असल्यामुळे सार्वजनिक स्वच्छता तसेच दिंडीतील वारकरी यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यामुळे राज्य सरकारकडून निर्मलवारी ही योजना राबवून दिंडीतील भाविकांना पिण्याचे पाणी व फिरते शौचालय व दैनंदिन सुविधा पुरवण्यात येत असतात. संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांच्या पालखीप्रमाणेच संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांचे पालखीतील वारकरी यांना सुविधा पुरवण्यासाठी निर्मलवारीसाठी २० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा २०२३ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने या घोषणेप्रमाणे निधी देण्यासाठी जुलैमध्ये पत्र पाठवूनही पुणे, नाशिक व जळगाव या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निर्मलवारीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला नव्हता. अखेरीस या पालख्या निघण्यास काही दिवस शिल्लक असताना ग्रामविकास मंत्रालयाने पुन्हा स्मरणपत्र देऊन तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी  ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यावर प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी दिली. त्यांनी दिंडीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून निर्मलवारीचा प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपवला. त्यांनी मागील आठवड्यात तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे.

नाशिक जिल्हा परिेषदेने तयार केलेल्या ६.५० कोटींच्या निर्मलवारीच्या प्रस्तावामध्ये वारीतील भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी जलप्रतिबंधक मंडपाचा समावेश केला आहे. या मंडपासाठी २ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. पालखी सोहळा प्रामुख्याने पावसाळ्यात असल्याने रस्त्यात पाऊस आला, तरी या मंडपामुळे मुक्कमाच्या ठिकाणी भाविकांना पावसापासून निवारा मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे भाविकांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी ६० टँकर प्रस्तावित केले असून एका टँकरसाठी दिवसाला ६ हजार रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. तसेच भाविकांसाठी २५० फिरचे शौचालयही या वारीत असणार असून प्रत्येक शौचालयासाठी २९०० रुपये भाडे प्रस्तावित आहे. तसेच विशेषत: महिलांसाठीही १५० फिरते स्नानगृहही या निर्मलवारीत असणार असून त्यासाठी प्रत्येकी २६०० रुपये दिवसाला भाडे असणार आहे. या शिवाय दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी विजेची सुविधा करण्यासाठी जनरेटरही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा नाशिक व सिन्नर या तालुक्यांमधील सात दिवस मुक्काम करणार असून पालखी सोहळ्यातील भाविकांना सुविधा देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन लाख रुपये निधी देण्याचा समावेश या प्रस्तावात घेतला आहे. याबरोबरच दिंडीसोबत पाच रुग्णवाहिका असणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

आराखडा केवळ नाशिक पुरता?
जिल्हा परिषदेने तयार केलेल्या निर्मलवारीच्या प्रस्तावात जलप्रतिबंधक मंडप,आरोग्य पथक व पाच पाण्याचे टँकर वगळता इतर सुविधा केवळ नाशिाक जिल्हयाच्या हद्दीत दिल्या जाणार आहेत. त्यानंतर नगर व सोलापूर जिल्ह्यातील सुविधांसाठी निर्मलवारीचा प्रस्ताव त्या त्या जिल्हा परिषदांना तयार केला असून त्यांनी त्या सुविधा पुरवायच्या आहेत. दिंडीतील भाविकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाच टँकर संपूर्ण दिंडी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली.