नाशिक (Nashik) : ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट 'क' संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात १ ते ७ मे या काळात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत गट 'क' संवर्गातील २,५३८ जागा रिक्त असून त्याच्या ८० टक्के म्हणजे २,०३० जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेकडून सध्या या जाहिरातीचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे.
राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले.
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे. या आराखड्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट 'क' व गट 'ड' या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ पदे गट क मधील आहेत, तर गट क मधील १८८ पदे रिक्त आहेत.
ग्रामविकास विभागाने केवळ गट कमधील रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील गट 'क' संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबवण्याची सूचना केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत गट 'क' संवर्गातील दोन हजार ५३८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली होती. सरकाने ती रखडलेली प्रक्रिया रद्द करीत सर्व विभागांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती पुन्हा रखडली होती.
दरम्यान आता पुन्हा नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वीच आयबीपीएस कंपनीशी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत करार केला आहे. यामुळे आता भरतीप्रक्रिया पार पडेल, असे संगितले जात आहे. दरम्यान जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सर्व काही सुरळीतपणे पार पडले, तर पुढच्या चार महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.