नाशिक (Nashik) : ईईपीसी इंडियातर्फे आयोजित आणि आयमा सहयोगी पार्टनर असलेल्या चेन्नई औद्योगिक प्रदर्शनात नाशिकच्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या ब्रॅंडिंगची नामी संधी मिळाली. त्यानंंतर कॅमेरून देशातील उद्योजकाने नाशिकच्या औद्योगिक परिसराला भेटी देऊन तीन उद्योजकांशी गुंतवणुकीबाबत करार केला आहे, अशी माहिती अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची संघटना 'आयमा'तर्फे देण्यात आली.
इंडोनेशियातील पीटी बेनुआ ग्रीन एनर्जी आणि अंबडच्या जान्हवी मशीन या कारखान्यांमध्ये या आठवड्याच्या सुरवातीला उत्पादनाबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. कॅमेरूनमधील कंपनीने केलेल्या या करारामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी नाशिकला प्राधान्य मिळत असल्याचे दिसत आहे.
चेन्नई येथील प्रदर्शनात नाशिकच्या उद्योजकांनी देशांतर्गत तसेच विदेशातील उद्योजकांशी 'बी-टू-बी' (बिझनेस टू बिझनेस) अंतर्गत संवाद साधला होता. संवादावेळी अनेकांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यानुसार आता हे उद्योजक नाशिकमध्ये गुंतवणुकीची तयारी करीत आहेत. भविष्यात बाहेरचे आणखी काही उद्योजक नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या आठवड्याच्या सुरवातीलाच इंडोनेशियातील पीटी बेनुआ ग्रीन एनर्जी आणि अंबडच्या जान्हवी मशीनससोबत करार केला आहे. या करारानुसार जान्हवी मशीन कंपनी मिग वेल्डिंग वायर निर्यात करणार असून, वर्षाला सुमारे शंभर कोटींची उलाढाल होणार असल्याचे उद्योजकांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर नाशिकमधून कोणती उत्पादने आयात करता येतील, याबाबत कॅमेरूनचे उद्योजक डेव्हिड यांनी गोगटे इलेक्ट्रो सिस्टिम कंपनीच्या संचालकांशी बोलणी केली. ही बोलणी यशस्वी झाली असून नाशिकमधून निर्यातीला यामुळे चालना मिळणार आहे.
डेव्हिड यांनी नाशिक मेटल डस्ट, श्रीगणेश इंडस्ट्रिअल कंट्रोल या कंपन्यांनाही भेटी देऊन त्यांच्या संचालकांशीही यशस्वी बोलणी केली आहे. आयमातर्फे सुरू करण्यात आलेला निर्यात व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि त्यानंतर निर्यातवाढीसाठी हाती घेतलेला जागृती कार्यक्रम यामुळे नाशिकमधील उद्योजक त्यांच्या उत्पादनांसाठी परदेशी बाजारपेठाचा शोध घेत असून, त्यातूनच वेगवेगळ्या देशातील उद्योजक नाशिकच्या उद्योजकांशी संपर्क साधत आहे.
यामुळे पुढच्या काळात नाशिकच्या उद्योजकांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याचे उद्योजकांकडून सांगितले जात आहे.