नाशिक (Nashik) : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (MGNAREGA) कामे करताना कुशल व अकुशल कामांचे ६०: ४० प्रमाण राखावे. आधी अकुशल कामे करून नंतर कुशल कामे करावेत, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हा परिषद (ZP) प्रशासनाला कान पिचक्या दिल्या आहेत. यामुळे मिशन भगीरथ, शाळांच्या संरक्षक भिंती आदी कामांचे नियोजन करताना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला अकुशल कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
रोजगार हमी योजनेची कामे करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. वर्ष अखेरपर्यंत हे प्रमाण राखले जाईल, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (ZP CEO Ashima Mittal) यांनी रोजगार हमी कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यावर ६०:४० प्रमाण आतापासून राखले नाही तर वर्षाच्या अखेरीस कसे राखले जाणार, असा प्रश्न उपास्थित झाला होता.
यावर 'टेंडरनामा'ने जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ, शाळांना संरक्षक भिंती व मंत्रालयातून मंजूर झालेली ९५:५ प्रमाण असलेली अतिकुशल कामे करण्याची भूमिका कायम ठेवल्यास त्यांना वर्षभरात जवळपास २३५ कोटींची रोजगार हमीची कामे करावी लागणार असल्याचे मांडले.
जिल्हा परिषदेने आतापर्यंत अधिकाधिक १०२ कोटींची कामे रोजगार हमीतून केलेली आहेत. यावर्षी ग्रामपंचायत विभागाने यावर्षी २४ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत ३ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती केली आहे. मात्र, सध्या नियोजित केलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५८ लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करावा लागणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेला ही कामे करताना ६०: ४०चे प्रमाण राखणे अवघड असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेत दोन आढावा बैठका घेतल्या. या बैठकीत ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले. यात पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या १०० मॉडेल स्कूलची कामे रोजगार हमीतून सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
तसेच मिशन भगीरथमधून सुरू असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांचीही यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी पालकमंत्री यांनी रोजगार हमीची कामे करताना कुशल व अकुशलचे ६०: ४०चे प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या.
रोजगार हमीची कामे करताना आधी अकुशल कामांना प्राधान्य द्या, म्हणजे प्रमाण कायम राहील, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांकडे गांभीर्याने न पाहणारे जिल्हा परिषद प्रशासन आता पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचना गांभीर्याने घेईल, असे बोलले जात आहे.