Mantralay Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : झिरवळ यांनी का बोलावली मंगळवारी मंत्रालयात बैठक? काय आहे तक्रार?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : रोजगार हमी योजनेतून मूलभूत सुविधा व पानंद रस्ते यासाठी दिंडोरी तालुक्यात मंजूर केलेली कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. वारंवार सूचना देऊनही जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती स्तरावरून दुर्लक्ष केले जात असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आता रोजगार हमी मंत्र्यांकडे बैठक बोलावली आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी उपजिल्हाधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, दिंडोरी तहसीलदार व दिंडोरी गटविकास अधिकारी यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे पत्र रोजगार हमी मंत्रालयाने पाठवले आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ६०:४० चे प्रमाण न राखण्याच्या कारणांची चर्चा होऊन अधिकाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मूलभूत सुविधा व मातोश्री पाणंद योजना यातून १४६८ कामे मंजूर करून आणली आहेत. रोजगार हमी योजनेतील २५ लाख रुपयांपर्यंतची कामे मंजूर करून त्यांना कार्यारंभ आदेश देण्याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना आहेत.

दरम्यान जिल्हा परिषदेने जलसंधारणासाठी भगिरथ प्रयास योजना सुरू केली असून त्यातून ६०० कामांचा आराखडा तयार केला असून त्यातील २५१ कामांना सुरवात हेऊन १६३ कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे ९५ टक्के कुशल व ५ टक्के अकुशल याप्रमाणे आहेत. तसेच आमदारांनी मंजूर करून आणलेली कामेही ९५:५ या प्रमाणातील आहेत. यामुळे दोन्ही कामे एकाच वेळी झाल्यास जिल्ह्यातील रोजगार हमीतील अकुशल व कुशल कामांचे  ६०:४० चे प्रमाण बिघडून जाईल.

यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून आमदारांनी मंजूर करून आणलेली कामे लगेच सुरू न करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान आमदारांनी केलेल्या पाठ पुराव्यामुळे काही तालुक्यांमधील आमदारांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची गती धीमी आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी-पेठ या मतदार संघातही ९५:५ ची कामे संथगतीने सुरू आहेत. यापूर्वी आमदार झिरवळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार पेठ तालुक्यातील काही कामे सुरू झाली आहेत. तसेच दिंडोरी तालुक्यातील ही कामे सुरू झाली असली तरी त्यांचे प्रमाण फार कमी आहे.

यामुळे रोजगार हमीच्या कामांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले आहे. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी (ता.२८) ही बैठक विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीचा विषय पत्रात नमूद केला नसला तरी प्रत्येक तालुक्यातील आमदारांनी मंजूर करून आणलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने, त्याबाबत बैठक असल्याचे मानले जात असून, त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात आमदारांनी मंजूर करून आणलेली ९५:०५ या प्रमाणाची १०८९ कामे सुरू केली जात नसल्याच्या कारणामुळे मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन महिन्यांपूर्वी बैठक घेतली होती. त्या बैठकीत या ९५:५च्या कामांमुळे ६०: ४० चे प्रमाण राखण्यात अडचणी येत असल्यामुळे गटविकास अधिकारी कामे सुरू करण्यास उत्सुक नसल्याच्या तक्रारी आमदारांनी रोजगार हमी मंत्र्यांकडे केल्या होत्या.

यामुळे रोजगार हमी मंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कामे सुरू करण्यात काय अडचणी आहेत, असा थेट प्रश्न विचारला होता. त्यानंतर सर्व गटविकास अधिकारी यांनी ही कामे सुरू केली होती. मात्र, ते प्रमाण फार कमी असल्याच्या आमदारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही बैठक बोलावली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.