Civil Hospital Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: दिवसाढवळ्या लूट करणाऱ्या त्या ठेकेदारावर काय कारवाई होणार?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील ३२ आरोग्य संस्थांमधील वस्त्र धुलाईचे कंत्राट असलेल्या ठेकेदाराने (Contractor) जादा दराने बिल सादर करून अधिक पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता जिल्हा शल्य चिकित्सकांनी रक्कम वसुलीची नोटीस पाठवली. यामुळे ठेकेदाराने साळसूदपणाचा आव आणत चुकीची देयके काढून घेतल्याची कबुली देत अमानत रक्कम तसेच आगामी देयकांच्या रकमेतून ही ३० लाखांची रक्कम वसुली करावी, असे पत्र जिल्हा रुग्णालयास दिले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

ग्रामीण रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. या रुग्णालयांमधील बेडशीट्स, चादरी इतकेच नाही तर शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना देण्यात येणारे कपडे नियमितपणे धुणे आवश्यक असते. हे काम जळगावातील मे. साई मल्टिसर्व्हिसेस या संस्थेला देण्यात आले.

वस्त्र धुलाईचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे वस्त्र धुलाईचे निश्चित दरापेक्षा अधिक दराने बिले सादर करून पैसे उकळल्याचे चौकशीतून समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

वस्त्र धुलाईचे कंत्राटाची बिले सादर करताना त्यावरील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी तसेच शिक्के देखील बनावट असल्याचा व संशय आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि सारा प्रकार उघड झाला. बिलांमध्ये तफावत आणि बनावट सही, शिक्के आढळल्याचा ठपका  समितीने ठेवल्यानंतर संबंधिताला ३० लाखांच्या वसुली नोटीस पाठविण्यात आली होती.

अखेर कंत्राटदाराने ३० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविली असून आपल्या आगामी देयक व अनामत रकमेतून रक्कम वसूल करण्यास त्याने परवानगी दिली आहे. म्हणजेच संबंधित कंत्राटदाराने वस्त्र धुलाईत आर्थिक घोटाळा झाल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले असून, उर्वरित ३० लाख रुपयांची वसुली जिल्हा रुग्णालय प्रशासन कशी करणार, याकडे लक्ष लागले आहे. तसेच या ठेकेदाराने बनावट सही शिक्क्यांचा वापर केल्याप्रकरणी काय कारवाई करणार याचीही उत्सुकता आहे.