नाशिक (Nashik) : नाशिक शहरात आउटसोसिंगच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून नाशिक पूर्व व पश्चिम विभागासह गोदावरी नदी किनाऱ्याची स्वच्छता केली जात आहे. वॉटरग्रेस कंपनी सातशे सफाई कामगारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम करीत आहे. या स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत 31 जुलैला संपल्यानंतर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्या काळातही नवीन टेंडर प्रक्रिया न राबवल्याने आता पुन्हा एकदा या ठेक्याला मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे.
यापूर्वीच आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी महापालिकेच्या सर्वच विभागांना कोणत्याही कामाची मुदत संपण्याआधीच टेंडर प्रक्रिया राबवच्या सूचना दिल्या असताना घनकचरा विभागाने मुदतवाढवूनही टेंडर प्रक्रिया राबवली नसल्याचे दिसत आहे. आता किमान या मुदतवाढीच्या काळात तरी नवीन टेंडर प्रक्रिया राबवली जाईरल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाशिक महापालिकेने शहर स्वच्छतेसाठीचा तीन वर्षांचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. या कंपनीचा ठेका सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला आहे. मागील वर्षी कंपनीने ऐन दिवाळीत चारशे कामगारांना कामावरून कमी केले होते. त्यावरून मोठा वाद उद्भवला होता. याशिवाय कामगारांचे वेतन थकवणे, ठरल्यापेक्षा कमी वेतन देणे, कर्मचाऱ्यांना मुलभूत सुविधा न देणे अशा अनेक तक्रारी संबंधित कामगारांनी केल्या आहेत. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्याबाबत काहीही कारवाई न केल्याने विभागाकडून ठेकेदारास पाठीशी घातले जात असल्याचेही आरोप झाले आहेत.
कामात अनियमिततेच्या तक्रारी असतानाही महापालिकेच्या चौकशीत सबंधित ठेकेदाराला क्लीन चीट देण्यात आलेली आहे. या कंपनीला महापालिका एका दिवसासाठी ७ लाख १९ हजार रुपये देते. या कंपनीच्या ठेक्याची मुदत यावर्षी जुलैमध्ये संपली. मुदत संपण्यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापन विभागाने टेंडर प्रक्रिया राबवून नवीन कंपनीला कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित होते. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाने याबाबत काहीही कार्यवाही केली नाही व नवीन टेंडर राबवले नसल्याने जुलैमध्ये या कंपनील तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.
या मुदतवाढीचा कालावधी येत्या ३१ ऑक्टोबरला संपणार असून अद्याप टेंडरबाबत काहीही हालाचाल झालेली नसल्याने पुन्हा या कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. महापालिकेत जुन्या ठेकेदार कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी वेळेत टेंडर प्रक्रिया राबवायची नाही. टेंडर प्रक्रिया सुरू केली तरी किमान सहा महिने त्यावर कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे प्रकार सर्रास केले जात असल्याचे प्रत्येक कामाच्या बाबतीत दिसून येत असते.
विद्यमान आयुक्तांनी त्यात बदल करण्याच्या सूचना देऊनही कार्यपद्धतीमध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाही. यामुळे या स्वच्छतेच्या ठेक्याला आणखी एक-दोनदा मुदतवाढ सहज मिळून जाणार असल्याचे बोलले जात आहे.
जबाबदार कोण?
घनकचरा व्यवस्थापन विभागाची सूत्रे नुकतीच पुन्हा डॉ. आवेश पलोड यांच्याकडे आली आहेत. या स्वचछतेच्या ठेक्याची पहिल्यांदा मुदत संपली तेव्हा तत्कालीन संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी मुदतवाढ दिली. आता नवीन संचालक डॉ. आवेश पलोड यांनी मुदतवाढ दिली. याबाबत प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असले, तरी दोघेही ठेकेदाराच्याच फायद्याचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे.