Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: रस्त्यावर पाण्याचा सडा टाकण्यासाठी 6 लाखांची उधळपट्टी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : दुरवस्थेमुळे वादग्रस्त ठरलेल्या नाशिक महापालिका (NMC) हद्दीतील पेठ रोडवरील धुळीचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाण्याचा सडा टाकण्यासाठी मागील तीन महिन्यांत तब्बल साडे सहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नुकतेच या सर्व खर्चाला महासभेने कार्योत्तर मंजुरी दिली.

नाशिक शहरात प्रवेश करताना नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वरील हॉटेल राऊ ते तवली फाटा या दरम्यान जवळपास साडे चार किलोमीटरच्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच; शिवाय येथून कायम प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

हे खड्डे बजावण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी टाकलेल्या मुरमामुळे रस्त्यावर माती झाली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर अक्षरशः धुळीचे लोट उसळतात. या धुळीमुळे परिसरातील घरे कुलूपबंद होत आहेत. नागरिकांना दम्याचा त्रास सहन करावा लागतोय. अशा पार्श्वभूमीवर या भागात स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून रस्ता करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी ७२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगून निधी नसल्याचे कारण स्मार्ट सिटी कंपनीने दिले.

दरम्यानच्या काळात माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्ता तयार होईपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून या भागात धुळीच्या रस्त्यावर रोज दोन टँकर पाण्याची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबवून एक कोटी ८८ लाख रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला जाणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाने २०१२ मधील दरानुसार एका टँकरसाठी ५६० रुपये आणि रोज दहा टँकर याप्रमाणे महिन्यातील ३० दिवस असा हिशोब करून एक लाख ९५ हजार रुपये खर्च गृहीत धरण्यात आला. त्यानुसार तीन महिन्यांसाठी ६ लाख ९० हजारांचा निधी खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे. या खर्चाला महासभेने नुकतीच मान्यता दिली.

एकीकडे पेठ रोडचे दुखणे कायमचे निकाली काढण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. सरकार स्तरावरून निधी मिळवण्यासाठी आमदार राहुल ढिकले प्रयत्न करीत आहेत. मात्र, महापालिका केवळ रस्त्यावर पाण्याचा सडा टाकण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत असल्याचे दिसत आहे.