Dr. Bharati Pawar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या दबावाने अखेरीस 47 आरोग्यवर्धिनी केंद्र मार्गी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्यावतीने आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येत आहेत. नाशिक महापालिका हद्दीत जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या १०६ केंद्रांपैकी ४७ आरोग्यवर्धिनी केंद्र पूर्ण झाले असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नुकतेच त्यांचे उद्घाटन झाले.

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवाअधिक सक्षम होणार असल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला. महापालिका प्रशासनाने जवळपास वर्षभरापासून चालढकल केलेल्या या कामांसाठी केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे अखेर मुहूर्त लागल्याचे दिसत आहे.

नाशिक शहरात महापालिकेची चार मोठी रुग्णालये, दोन प्रसूतिगृह व ३० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, ग्रामीण भागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य सेवेचे जाळे नागरी भागातही उभारण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून, त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी निधी दिला जात आहे. यात लोकसंख्येनुसार नागरिकांना चांगल्या दर्जाची व सत्वर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून महापालिकेला ६५ कोटी रुपये निधी दिला.

या निधीतून महापालिकेने १०६ आरोग्यवर्धिनी केंद्र प्रस्तावित केले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. सुरवातीला या आरोग्य केंद्रासाठी जागा नसल्याचा मुद्दा प्रशासनाने समोर आणला. महापालिकेने स्वयंसेवी संस्थांना दिलेल्या सभागृहांमध्ये ही आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी संबंधितांना जागा खाली करण्याच्या नोटीसा पाठवल्या. मात्र, बहुतांश सभागृह आमदारांनी आणलेल्या निधीतून बांधलेली आहेत व ही सर्व सभागृह कार्यकर्त्यांच्या संस्थाना दिलेली असल्याचे आमदारांचाही आरोग्य वर्धिनी केंद्रांना जागा देण्यास विरोध होता.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेतही त्यांनी उघड विरोध केला होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिकेने डिसेंबरमध्ये ५९ कामांना कार्यारंभ आदेश दिले व त्यातील ३० आरोग्य वर्धिनी केंद्र या वर्षाखेरीस काम पूर्ण होऊन १५ जानेवारीस उद्गाटन करण्याबाबतही राज्यमंत्र्यांना आश्वस्त केले होते.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना याबाबत नोटीसाही दिल्या होत्या. यामुळे अखेरीस मार्चपर्यंत ४७ आरोाग्य वर्धिनी केंद्रांची कामे पूर्ण होऊन त्यांचे प्रत्यक्ष उद्घाटन झाले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्यावतीने मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरात २५ ठिकाणी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जाणार आहेत.