Sahyadri Farms Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 20 कोटींची गुंतवणूक, 300 महिलांना रोजगार; नाशकात 'सह्याद्री'चं पुढचं पाऊल!

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने (Sahyadri Farmers Producer Company) मोहाडी येथे २० कोटी रुपयांची गुंतवणूक करून काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. या उद्योगाची क्षमता दैनंदिन १०० टन काजू उत्पादनाची असून हा राज्यातील सर्वात मोठा प्रक्रिया उद्योग आहे.

या उद्योगामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून यामुळे ३०० महिलांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होणार आहे.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले की, काजू उत्पादनात भारत जगात आघाडीवर असला तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करू शकत नाही. यामुळे काजू उत्पादन व व्यापाराला देशात मोठी संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होते.

नाशिक व शेजारच्या पालघर जिल्ह्यात काजूचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन होत असताना जिल्ह्यात पेठमध्ये बायफ संस्थेचा एकमेव काजूप्रक्रियाचा छोटासा उद्योग आहे. यामुळे ‘सह्याद्री’ने काजू उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

सह्याद्रीने काजू प्रक्रिया उद्योगासाठी मोहाडी येथे २० कोटी रुपये गुंतवणूक केली असून त्यातून ३०० महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. मोहाडी येथील हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प असून देशातील सर्वात मोठ्या दहा प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पात काजूच्या गरापासून काजू प्रक्रिया करण्याबरोबरच काजूच्या कवचापासून तेलनिर्मिती करण्याचाही प्रकल्प सुरू केला आहे. या काजू तेल उद्योगाची क्षमता प्रतिदिन १० टन असणार आहे.

सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या काजू पक्रिया उद्योगामुळे आदिवासी भागातील काजू उत्पदक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच काजू उत्पादन, प्रक्रिया व विपणन अशी मूल्यसाखळी विकसित केली जाणार आहे. यामुळे त्याचा थेट लाभ उत्पादकांना मिळण्यास मदत होईल.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, नाशिक.