Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थाचा परिसर विद्युत रोषणाईने उजळणार; 167 कोटींचा आराखडा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने आगामी सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी सर्व विभागांचा मिळून ११ हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात विद्युत विभागाचा १६७ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश असून, या निधीतून साधुग्राम परिसरात सीसीटीव्ही, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स, शाहीस्नान मार्ग परिसर लेझर शो तसेच रोषणाईने उजळून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधा उभारून पर्यटनाला चालना दिली जाते. तसेच यानिमित्ताने दर बारा वर्षांनी नाशिक शहरातील पायाभूत सुविधांमध्ये भर पडत असते. यामुळे नाशिक महापालिकेने सिंहस्थ प्रारुप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात महापालिकेच्या ४२ विभागांनी सूचवलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने या प्रारुप आराखड्यात १६७ कोटींची कामे सूचवलेली आहेत. सिंहस्थात साधुग्राम, गोदावरी नदी परिसर, शाहीमार्ग हे भाविकांचे व पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण केंद्र असतात. सिंहस्थ काळात कोट्यवधी भाविक या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे हा परिसर रोषणाईने उजळून टाकण्याचे नियोजन महापालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे.

साधुग्राम परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करून साउंड सिस्टिम बसवली जाणार आहे. लेझर शो व स्ट्रीट लाइट ब्युटिफिकेशन यावर भर दिला जाणार असून, त्या माध्यमातून संपूर्ण परिसर उजळून निघेल. साधुग्राम परिसरात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांसह व्हीआयपी लोकांची वर्दळ असेल. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अतिसंवेदनशील असणार आहे. ते पाहता या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार असून, त्यासाठी कंट्रोल रूमही उभारला जाणार आहे. तसेच यावेळी इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचेही नियोजन केले आहे. यासाठी १६७ कोटी रुपयांचा आराखडा विद्युत विभागाने तयार केला आहे.

विद्युत विभागाचा आराखडा
- सिंहस्थ साधुग्राम परिसरात विद्युत पोल, ट्रान्स्फॉर्मर बसवणे
- गंगाघाट विद्युतीकरण, नवीन हायमास्ट बसवणे
- वाहनतळाचे विद्युतीकरण करणे
- अंतर्गत रिंगरोडवर विद्युत पथदीप बसवणे
- स्मार्ट सिग्नल बसवणे, सिंहस्थ कंट्रोल रुमसाठी विद्युतीकरण करणे