नाशिक (Nashik) : नाशिक सिडको, सातपूर व पश्चिम या विभागासाठीच्या धूर फवारणी कामाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेला अखेर सात महिन्यांनी पन्हा मुहूर्त लागला आहे. या टेंडर प्रक्रियेला मागील आठवड्यात सुरुवात झाली असून, २२ फेब्रुवारीपर्यंत संस्थांना यात सहभागी होता येणार आहे.
या महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यास लवकरच सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम तीनही विभागांसाठी स्वतंत्रपणे पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जाणार आहे. धूर फवारणीच्या कामाची चार वर्षांपासून टेंडर प्रक्रिया सुरू होऊनही त्यातील केवळ पन्नास टक्के काम पूर्ण झाले व उर्वरित टेंडर प्रक्रिया वादात सापडलेली असून, ती आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून शहरातील सहा विभागांकरिता दोन टप्यांत टेंडर प्रक्रिया राबवली गेली. पहिल्या टप्यात नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्व या विभागात १६ कोटी ५० लाख खर्चून दिग्विजय कंपनीकडे तिन्ही विभागांचे काम देण्यात आले, तर सिडको, सातपूर व पश्चिम येथील प्रक्रिया वादात सापडल्याने दिरंगाई झाली. प्रकरण थेट न्यायालयात गेल्याने टेंडर प्रक्रिया रखडली होती. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाकडून संपूर्ण शहरासाठी दिलेला पेस्ट कंट्रोलचा ठेका ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात आधीच्या १८ कोटींच्या ठेक्याची किंमत ४६ कोटींवर पोहोचली होती. याबाबत ओरड झाल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी टेंडर प्रक्रिया रद्द करून फेरटेंडर प्रसिद्ध केले.
या टेंडरमध्ये सहभागी असलेल्या मेसर्स दिग्विजय एंटरप्राइजेसने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने महापालिकेच्या फेरटेंडर विरोधात निकाल दिला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातील अनावश्यक कामांना कात्री लावून ४६ कोटींचा ठेका ३३ कोटी रुपयांपर्यंत खाली आणला. त्यातही सिडको, नाशिक पश्चिम व सातपूर विभागासाठी एक, तर नाशिक रोड पूर्व व पंचवटी विभागासाठी एक असे दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सिडको, सातपूर व नाशिक पश्चिमसाठी एसआर पेस्ट कंट्रोल, तर पूर्व व पंचवटी विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले. मात्र, ठेका न मिळालेल्या सूरज एंटरप्राइजेसने एसआर पेस्टकंट्रोलमार्फत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.
टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम या तीन विभागांच्या पेस्ट कंट्रोलच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. उच्च न्यायालयाने जूनमध्ये स्थगिती दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये टेंडर प्रक्रियाच रद्द केली होती. न्यायालयाने तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया राबवण्याच आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने फेब्रुवारीत सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम या विभागांसाठी धूर फवारणीची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, या टेंडरमध्ये सहभागी होण्यासाी असलेली २२ फेब्रवारीपर्यंतची मुदत व त्यानंतरच्या तांत्रिक बाबी पूर्तता करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता आधीच्या ठेक्याला पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान सातपूर, सिडको व नाशिक पश्चिम या तीन विभागांसाठी धूर फवारणीचे कामासाठी कामगार आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतनासह इतर अटी-शर्ती पूर्ण करणारी संस्था पात्र ठरणार असल्याचे महापालिकेच्या मलेरिया विभागाने स्पष्ट केले आहे.