नाशिक (Nashik) : महापालिकेकडून शहरात चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारण्याच्या कामाचे टेंडर (Tender) अखेरीस वर्षभराने मार्गी लागले असून, या कामासाठी दिल्ली येथील कंपनी पात्र ठरली आहे.
नाशिक शहरात पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत म्हणजे एनकॅपमधून १० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सुरवातीला टेंडरमधून काही कंपन्यांनी माघार घेणे, टेंडरला प्रतिसाद न मिळणे आदी कारणांमुळे ही टेंडर प्रक्रिया लांबली होती.
केंद्र व राज्य सरकारकडून हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदानही दिले जात आहे.
नाशिक शहरातही इलेक्ट्रिक वाहनास पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिकेने शहरात १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजित केले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे केंद्र सरकारकडून दिल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधीतून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी चाार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात आले होते.
महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने राबवलेल्या पहिल्या टेंडरमध्ये रिलायन्ससह टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला. मात्र, या कंपन्यांनी प्रिबिड बैठकीनंतर टेंडरमधून माघार घेतल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राबवलेल्या दुसऱ्या टेंडरला कमी प्रतिसाद मिळाल्याने ऑक्टोबर २०२३ला तिसरी टेंडर प्रक्रिया राबवली.
या टेंडर प्रकियेत दिल्ली येथील कंपनी या कामासाठी पात्र ठरली आहे. या कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. आणखी काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. त्यानंतर शहरातील २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होईल. यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च होणार आहे.
याठिकाणी होणार स्टेशन
राजे संभाजी स्टेडिअम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान, राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन.