नाशिक (Nashik) : महापालिकेने शहरातील सहाही विभागांत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी दहा कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्यात २० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया राबवली जात असून, पहिल्या दोन टेंडरमध्ये समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने आता तिसरे फेरटेंडर प्रसिद्ध केले असून त्यात रिलायन्ससह टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
या कंपन्यांनी पहिल्या टेंडरमध्येही सहभाग घेतला होता. मात्र, प्रिबिड बैठकीनंतर त्यांनी माघार घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. दरम्यान टाटा, रिलायन्स या प्रथितयश कंपन्यांनी पुन्हा सहभाग घेतल्याने आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारणीचे टेंडर मार्गी लागण्याची शक्यता आहे.
प्रदुषणमुक्तीसह पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्यात १ एप्रिल २०२२ पासून शहरातंर्गत सर्व शासकीय निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहणे असणार आहेत. प्रदुषणावर नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिग स्टेशन उभे करण्यासाठी दिली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिग स्टेशन्स उभारण्यासाठी आर्थिक हात पुढे केला आहे.
नाशिक शहरात चार्जिंग स्टेशन्ससाठी १०६ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात खासगी जागांचा देखील समावेश करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात वीस ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.
सध्या नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल असला तरी चार्जिंग सुविधा नसल्याने वाहने घेताना ते कचरतात. चार्जिगची सुविधा मिळाल्यावर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू शकते. महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत देखील लवकरच १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार असल्याने त्यांच्यासाठी या चार्जिंग स्टेशन्सची मदतच होणार आहे.
पहिल्या टप्यातील चार्जिग स्टेशन
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन व शहरातील पालिकेचे सहाही विभागीय कार्यालये, तपोवन बस डेपो, राजे संभाजी स्टेडियम, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालयालगत, उपनगर, आरटीओ कॉलनी, बोधलेनगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, तसेच महात्मानगर क्रिकेट मैदान या ठिकाणांचा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स केली जाणार आहे.