नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या माध्यमातून भाजपने आडगाव शिवारात प्रस्तावित केलेल्या आयटी पार्कचा विषय प्रलंबित असताना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या बैठकीत नाशिक तालुक्यातील राजूर बाहुला येथे आयटी पार्कसाठी दोन टप्प्यात शंभर एकर जागा आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
खासदार हेमंत गोडसेही या बैठकीस उपस्थित होते. उद्योगमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीत आयटी पार्कसाठी १०० एकर जागा आरक्षित ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आता आयटी पार्कची जागा बदलून शिंदे गटाने या मुद्द्यावर भाजपवर मात केल्याचे दिसत आहे.
नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने स्थानिक तरुणांना पुणे, बंगळूर आदी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. यामुळे नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्याची मागणी होत आहे. यासाठी नाशिक महापालिकेने २०२२ मध्ये एक परिषद घेऊन आयटी पार्कसाठी आडगाव शिवारात जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. पुढे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या आयटी पार्कचा विषय मागे पडला. दरम्यान मधल्या काळात नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिकचा आयटी पार्कचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान याच काळात आयटी पार्क व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनेकदा भेट घेऊन आयटी पार्क मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आयटी पार्क उभारण्यासाठी कमीत कमी शंभर एकर जागा आरक्षित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे तगादा लावला होता. त्यानुसार उद्योमंत्र्यांनी उद्योग विभागाची बैठक घेतली. बैठकीत आयटी पार्कसाठी जागा आरक्षित करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी खासदार गोडसे आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिक तालुक्यातील राजूर बहूला येथे आयटीसाठी दोन टप्प्यात शंभर एकच जागा आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, विकास आयुक्त कुशवाह, एमआयडीसीचे सहकार्यकारी अधिकारी मलिक नेर, उद्योग विभागाचे सहसचिव पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
भाजपच्या आयटी पार्कवर शिंदे गटाची मात?
महापालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन आयटी पार्कसाठी उद्योग परिषद घेतली होती. त्या परिषदेत महापालिकेने आडगाव शिवारात आयटी पार्कसाठी ३५० एकर जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली. यामुळे आयटी पार्कचा विषय मागे पडला.
दरम्यान ऑगस्टमध्ये नाशिक दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीतील १०० एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी अडगावच्या प्रस्तावित आयटी पार्कचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
उद्योगमंत्र्यांची ती घोषणा हवेत विरण्याच्या दोन महिन्यांच्या आताच आता खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक तालुक्यातील राजूर बाहुला येथे आयटी पार्कसाठी उद्योगमंत्र्यांनी दोन टप्प्यांत १०० एकर जागा आरक्षित ठेवण्यास मान्यता दिल्याची बातमी आणली आहे. यामुळे नाशिकला आयटी पार्क प्रत्यक्षात येण्यापेक्षा आयटी पार्कच्या माध्यमातून एकाच सरकारमध्ये असलेल्या भाजप व शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधीमध्ये राजकीय कुरघोडी जोरात सुरू आहे. या बैठकीतून सध्या तरी शिंदे गटाने भाजपवर मात केल्याचे दिसत आहे.