Indian Railway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : रेल्वेने दिली गुड न्यूज; 'या' सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा वेग आणखी वाढणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : रेल्वेने भुसावळ विभागातील भुसावळ-मनमाड-इगतपुरी ते मुंबई दरम्यान वाढीव एक रेल्वे ट्रॅकसह एकूण तीन ट्रॅकचे नुतनीकरण, सिग्नलिंग व तांत्रिक कामांत सुधारणा केली आहे. परिणामी आता ताशी ११० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक- मुंबई प्रवास २० मिनिटांनी कमी झाला आहे व मनमाड ते मुंबई प्रवासात २७ मिनिटांची बचत होत आहे. यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांच्या वेळेत त्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने सर्वच ठिकाणी एकेरी मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कामे सुरू आहेत. या निर्णयानुसार भुसावळ विभागातील मनमाड ते दौंड ही रेल्वेची एकेरी मार्गिका दुहेरी करण्याचे काम सुरू असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे रेल्वेने मनमाड ते मुंबई दरम्यान तिसरी रेल्वे लाईन टाकली असून या रेल्वे मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे.

यामुळे रेल्वेने सुरक्षिततेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर भुसावळ विभागात इगतपुरी-नाशिक-मनमाड-भुसावळ या मार्गावर अनेक रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे.

यामुळे मनमाडहून पंचवटी एक्स्प्रेस नाशिकरोडला आता ५९ नव्हे तर ५३ मिनिटांतच येणार आहे. इगतपुरी-नाशिक, मनमाड-भुसावळ, अकोला-बडनेरा या विभागांचे एकूण अंतर ५२६.६५ किलोमीटर आहे. या मार्गावर विविध गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मनमाड- दौंड लोहमार्गाच्या दुहेरीकरणामध्ये पुणतांबा-शिर्डी विभागात रेल्वे प्रवासी गाड्यांचा वेग ७५ वरून ११० किलोमीटरप्रति तास करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने भुसावळ विभाात अनेक रेल्वे ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, ट्रॅकचा दर्जा उत्तम राखणे, काही जुने ट्रॅक बदलल्याने वेगात वाढ झाली आहे. लवकरच या मार्गावरील सर्व स्थानकावरील सर्व रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाही बदल केला जाणार आहे.