नाशिक (Nashik) : यावर्षी अल निनोच्या प्रभावाचा देशातील मॉन्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान पूर्वानुमान विभागाकडून वर्तवली जात आहे. अल-निनोमुळे उशीरा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे सरकारकडून जुलै व ऑगस्टमध्ये पाऊन न पडल्याच्या परिणामांचा विचार करून टंचाई निवारणाची पूर्वतयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने टंचाईकृती आराखडा तयार केला आहे.
या कृती आराखड्यात जुलै व ऑगस्टमध्ये बैलगाडी अथवा टँकरने पाणी पुरवठा करण्यावर १९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. एकूण टंचाई कृती आराखडा २०.६७ कोटी रुपयांचा असून, त्यापैकी जुलै-ऑगस्टमध्ये टँकरने पाणी पुरवठ्यावर १९ कोटी रुपये खर्च निव्वळ टँकरने पाणी पुरवण्यावर करण्याचे नियोजन आहे. यामुळे संभाव्य टंचाई टँकर लॉबीच्या पथ्यावर पडणार असून, या आराखड्याच्या वस्तुनिष्ठतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवामान पूर्वानुमान विभागाने यावर्षी अल-नीनोचा प्रभाव राहणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे भारतात कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पाऊस उशिरा येणार असल्याचे गृहित धरून टंचाई निवारण कृती आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या आठवड्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच बैठक घेऊन जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमधील संभाव्य टंचाई गृहित धरून उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणांमधील साठा व ऑगस्टअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांचे सादरीकरण केले. यासाठी त्यांनी उन्हाळी सिंचन आवर्तनात कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सुधारित टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी २०.६७ कोटींच्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. सध्या जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असल्यामुळे या सुधारित कृती आराखड्यामध्ये पाणी पुरवठा योजनांचा समावेश न करता टंचाई असलेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर दिला आहे. या विभागाच्या अंदाजानुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ६०२ गावे व ८६९ वाडया अशा एकूण १४७१ गावे वाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे.
या गावे व वाड्यांना टँकरने सलग दोन महिने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १८.९४ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आराखड्यात नमूद केले आहे. जिल्ह्यात १९०० वर गावे असून त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी या दोन महिन्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वर्तवली आहे.
अल-निनोच्या प्रभावामुळे देशाच्या काही भागांमध्ये कमी पर्जन्यमान होते, असा यापूर्वीचा अनुभव असल्यामुळे सरकारने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचा आराखडा तयार केल्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
टँकरने पाणी पुरवठा करण्यात यापूर्वी टँकर लॉबीने जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर अपहार केला असून त्यात झालेल्या चौकशांमध्ये अनेक अधिकाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत. त्यातून टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याची वेळ आली होती. त्यानंतरही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून टँकरने पाणी पुरवण्यासाठी १९ कोटी रुपये प्रस्तावित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
टंचाई आराखड्यातील उपाययोजना
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १४७१ गावांतील संभाव्य पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी या गावांमध्ये प्रगतिपथावर असलेल्या नळयोजनांची कामे तातडीने पूर्ण करणे (२९ कामे), नवीन विंधन विहिरी खोदणे यात ३४ कामांसाठी १.५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण व दुरुस्ती करणे यात १७ कामांसाठी १.७ कोटींचा खर्च, तर टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे यात १२३४ कामांसाठी १८.९४ कोटींचा खर्च, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे यात १८७ कामांकरिता १.४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.