Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

NASHIK: साधुग्राममधील जमीन भूसंपादनासाठी 3 हजार कोटी द्या!

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : २०२७-२०२८ या वर्षात नाशिकमध्ये होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राममधील तब्बल २६४ एकर जमीन अधिग्रहित करावी यासाठी नाशिक महापालिकने हालचाली सुरू केल्या आहेत. या भूसंपादनासाठी तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम लागणार आहे. नाशिक महापालिका एवढ्या मोठ्या रकमेचे भूसंपादन करू शकणार नाही. यामुळे या संपूर्ण भूसंपादनाचा भार राज्यशासनाने उचलावा, असा प्रस्ताव महापालिका राज्य शासनाला पाठवणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या संपादित जमिनीच्या उताऱ्यावर राज्य सरकारचेच नाव असावे, असाही पर्याय यासाठी सरकारला या प्रस्तावातून दिला जाणार आहे.

आगामी सिहंस्थ कुंभमेळा नियोजनाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या पार्शवभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कुंभमेळा नियोजन बैठक झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२०२८ या वर्षात होणार आहे. सिंहस्थात येणाऱ्या साधुंसाठी साधुग्राम व शाहीस्नान या प्रमुख बाबी असतात. देशभरातून आलेल्या साधुसंतांचा साधुग्राम या ठिकाणी मुक्काम असतो. मागील सिंहस्थात तपोवन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वर्षभरासाठी भाडे पट्ट्याने घेऊन त्यावर सुविधा उभारल्या होत्या. मात्र, साधुग्राम व त्यासाठी रस्ते व इतर सोईसुविधा उभारण्यामुळे या जमिनी नापिक होऊन जातात. यामुळे महापालिकेने त्याचे कायमस्वरुपी भूसंपादन करून मोबदला द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. महापालिकेने निधी नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना एफएसआयचा पर्याय दिला होता. मात्र, शेतकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने भूसंपादन रखडले. कायमस्वरूपी साधुग्रामसाठी भूसंपादनाचा विषय आठ वर्षांत मार्गी लागला नाही. भूसंपादनाची केवळ चर्चा होते. शेतकऱ्यांची आंदोलन होतात. मंत्रालयात दौरे होतात. पण कायमस्वरूपी भूसंपादन मात्र होतच नसल्याने शेतकऱ्यांनी यापूर्वीच साधुग्रामसाठी जमिनी न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. या जमिनींसाठी भूसंपादन प्रक्रिया राबवल्यास जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक २२०० कोटी रुपयांचे असल्यामुळे महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे साधुग्रामसाठी राज्यसरकारनेच भूसंपादन करावे व ती जमीन सरकारच्याच नावावर राहू द्यावी, असा पर्याय महापालिका सुचवणार आहे.

 

४१ एकर जमिनीचा उपयोग
दरम्यान साधूग्राममध्ये १ लाख ६५ हजार चौरस मीटर म्हणजेच ४१ एकर क्षेत्र हे राखीव उद्यानासाठी आहे. आता या क्षेत्राचा वापर आगामी सिहंस्थ कुंभमेळ्यात पहापालिका प्रशासनाकडून केला जाणार आहे. यामुळे उपस्थित भावाविकांच्या हे सोयीचे ठरणार आहे.