नाशिक (Nashik) : मागील वर्षी संपूर्ण पावसाळाभर महापालिकेने (NMC) रस्त्यांवरील खड्डे (Potholes) बुजवण्याचा खेळ खेळल्यानंतर यावर्षी तरी काही सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र, नाशिकमध्ये पावसाला सुरुवात होताच यावर्षीही नाशिककरांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार असल्याचे दिसत आहे.
एकीकडे पाऊस सुरू असताना रस्त्यांची कामेही सुरू आहेत. तसेच उन्हाळ्यात खोदलेले रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत. यामुळे ही कामे पावसाळ्यानंतरच होणार असल्याने तोपर्यंत खड्ड्यांचा त्रास कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात निकृष्ट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. त्यामुळे नाशिक शहरात आंदोलने झाली. माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पुढील वर्षी ३० मेच्या आत रस्ते दुरुस्ती करून घेतली जाईल, असे आश्वासन देऊन बांधकाम विभागाला तशा सूचना दिल्या होत्या.
दरम्यान विविध कारणांसाठी रस्ते खोदण्यासाठी परवानगी दिलेल्या कंपन्यांनी काम थांबवल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण केली नाहीत. या कंपन्यांनी रस्ते खोदकामापोटी महापालिकेला १५० रुपये रक्कम दिलेली आहे. मात्र, बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीबाबद केलेली डोळेझाक गंभीर आहे.
यावर्षी नेहमीपेक्षा उशिरा पाऊस आला असूनही जवळपास ५०टक्के रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत. यामुळे बांधकाम विभागाने यंदाही दिडशे कोटीचे डांबर पाण्यात घालण्याची तयारी केली की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे.
गॅस पाइपलाइनसाठी शहरभर खोदलेले ११३ किलोमीटर रस्त्यांपैकी ७३ किमी रस्त्यांवर खडीकरण, तर ५० किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण झाले आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरवात झाली आहे. तर खडीकरण झालेले रस्ते खचत आहे. वास्तविक शहरात पावसाचे प्रमाण अजून खूपच कमी आहे. जेमतेम पावसातच शहरातील रस्त्यांची अशी दुरवस्था होत असल्यास, गेल्या वेळच्या तक्रारीपासून महापालिकेने काय बोध घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाचा जोर वाढला म्हणजे, रस्त्याची दुरवस्था होते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरण उरकल्यानंतर निकृष्ट रस्त्यांच्या पापाबाबत पावसाकडे बोट दाखवले जाते. शहरभर २४७ किलोमीटर रस्त्यांवर कामापैकी पहिल्या टप्प्यात ११३ किलोमीटर रस्त्यांची खोदाई झाली असून, १३३ किलोमीटर रस्त्यांवर पावसाळ्यानंतर खोदाई होणार आहे.