Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: आता पावसाळ्यात नाशकातील रस्ते तुंबणार नाहीत; कारण...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : दरवर्षी जोरदार पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर व चौकांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडी होत असते. शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याचेही प्रकार घडतात. यातून महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर टीका होत असते.

पावसाळ्यात पावसाचे पाणी दर वर्षी शहरात साचून रस्तेच पाण्याखाली जात असल्याने महापालिकेने नियोजन केले आहे. यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने पाणी तुंबणारी २११ ठिकाणे शोधून तेथील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.

नाशिक शहरात रस्त्यांचे काम करताना सखल भागात पावसाचे पाणी थांबून रस्ते तुंबू शकतात याचा विचार करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात या सखल भागांमध्ये तसेच चौकांमध्ये रस्त्यांवर पाणी साचते व त्या साचलेल्या पाण्यामुळे डांबरी रस्ते खराब होऊन तेथे मोठमोठे खड्डे पडतात. जोरदार पाऊस पडल्याने रस्ते तुंबल्याने शहरभर वाहतूक कोंडी होत असते. तसेच सातत्याने पाणी साचल्याने रस्त्यांवर खड्डे पडतात. यासाठी महापालिकेला पावसाळ्यात मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करावी लागते व ते खड्डे बुजवण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागते.

मागील वर्षी तीन महिन्यांच्या सलग पावसामुळे हे प्रकार वारंवार घडल्याने महापालिकेवर सर्व थरातून खूप टीका झाली होती. त्याचप्रमाणे शहरातील दहीपूल, मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सारडा सर्कल परिसरासह अशोक स्तंभ, गंगापूररोड, महापालिका मुख्यालय परिसर, कॉलेजरोड या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असते. यावर कायमचा तोडगा शोधण्यासाठी महापालिकेने शहरातील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतला आहे.

शहराच्या सर्व विभागांमध्ये पावसाचे पाणी तुंबणारे २११ ठिकाणांवर पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने उपाययोजना सुरू केल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. आतापर्यंत २११ पैकी १३८ ठिकाणी बांधकाम विभागाने पाणी साचू नये यासाठीची उपाययोजना पूर्ण केली असून, ७३ ठिकाणचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती शहर अभियंताशिवकुमार वंजारी यांनी दिली. यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

पाणी साचणारी विभागनिहाय ठिकाणे

विभाग...................पाणी तुंबणारी ठिकाणे

नाशिक पूर्व             २६

नाशिक पश्चिम          २४

पंचवटी                 २४

नाशिकरोड             ३९

सिडको               ६७

सातपूर               ३१

एकूण              २११