citylink Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : उत्पन्न वाढविण्यासाठी सिटीलिंकने काय शोधले पर्याय? लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शाळांना उन्हाळ्याची सुटी असल्यामुळे नाशिक महापालिका परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक या बससेवेच्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी सिटीलिंकने इतर पर्यायांचा शोध सुरू केला असून त्यात राज्य परिवहन महामंडळाप्रमाणे पार्सल सेवा सुरू करणे तसेच बस तिकिटांवर जाहिरात प्रसिद्ध करणे या मार्गांचा अवलंब केला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सिटीलिंक कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

महापालिकेने जुलै २०२१ पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सिटीलिंक ही शहर बससेवा सुरू केली आहे. या शहर बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असले तरी या सिटीलिंकला पहिल्या वर्षी ७० टक्के, दुसऱ्या वर्षी जवळपास ८० कोटी रुपये तोटा झाला असून यावर्षी तो तोटा शंभर कोटींच्या आसपास जाणार आहे. त्यामुळे ही बससेवा महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळाची (सिटीलिंक) आढावा बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत सिटीलिंकचे तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचा मुद्दा समोर आला होता. सिटीलिंक चालवण्यासाठी वर्षाला १६३ कोटी रुपये खर्च येत असूनही उत्पन्न केवळ ८३ कोटी रुपये आहे.

सिटी लिंक चालवण्यासाठी सध्या २५० बसेस ऑपरेटर करणारे दोन ठेकेदार, ५०० वाहकांचा ठेका असणारे दोन ठेकेदार, तसेच एसटी महामंडळाचे दोन अधिकारी आणि शासनाचा एक अधिकाऱ्याच्या वेतनांचा खर्च, कार्यालयीन मनुष्यबळ असून त्यांचा वेतन खर्च, वीजबील, शासनाचा कर अशा सर्व खर्चाची जबाबदारी सिटीलिंकची आहे. यामुळे बस चालवण्याच्या खर्चाबरोबरच या वेतनाचाही बोजाही महानगर परिवहन महामंडळावर पडतो.

केवळ प्रवाशांकडून आकारल्या जात असलेल्या तिकिटावरच अवलंबून न राहता उत्पन्नाचे इतर मार्ग शोधण्याबाबत त्यावेळी चर्चा झाली होती. दरम्यान उन्हाळ्यात प्रवासी वाढण्याऐवजी घटले आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकचे बसथांब्यांवर जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात अपेक्षित यश आलेले नसल्याने आता उत्पन्नवाढीसाठी पार्सलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिटीलिंकच्या बसेस पिंपळगाव, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीपर्यंत धावतात. त्यामुळे या भागात पार्सलसेवा सुरू केली जाणार असून, त्याचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे. या सेवेसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असून, आचारसंहितेनंतरच टेंडर प्रसिद्ध केले जाऊ शकते.

त्याचप्रमाणे सिटीलिंक बसच्या तिकिटावर जाहिराती प्रसिद्ध करण्यास परवानगी देण्याचा प्रस्तावही सिटीलिंक संचालक मंडळाने मंजूर केला असून, आचारसंहिता संपल्यानंतर एजन्सी नियुक्त केली जाणार आहे.