galmukt dharan galyukt shivar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिक जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजना जोरात; मग गंगापूर धरणातून गाळ काढण्याच्या कामात का आले विघ्न?

टेंडरनामा ब्युरो

Nashik News नाशिक : जिल्ह्यात गाळमुक्त घरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभागाकडून धरणे व बंधारे यांच्यातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत या योजनेतून २.१६ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून तो शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतात वाहून नेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे व बंधारे यांची मिळून ७.५ दलघफूने पाणीसाठा वाढला आहे.

दरम्यान या योजनेची सुरवात झालेल्या गंगापूर धरणातील गाळ वाहून नेण्यावरून शेतकरी व प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गाळ वाहून नेत असलेल्या हायवा वाहनांचे दर अधिक असून ते शेतकऱ्यांऐवजी विकासकांना प्राधान्य देत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची यावर्षी अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या योजनेची प्रभाी अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे योगदान व लोक सहभाग वाढणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील बँकांनी 'सीएसआर' मधून या योजनेच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नंदकुमार साखला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, एमआयडीसीचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा व मृद व जलसंधारण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मृदा व जलसंधारण विभागामार्फत आतापर्यंत  ७० हजार ६७१ घनमीटर गाळ काढण्यात आला असून लोकसहभागातून ३० हजार २०६ घनमीटर गाळ काढला आहे. विशेष म्हणजे गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेला.

सरकारी योजनांमधून धरणाची घळभरणी कामासाठी एक लाख पाच हजार घनमीटर गाळ वापरला गेला आहे. जलसंपदा विभाग व जलसंधारण विभाग मिळून एकूण जवळपास २ लाख १६ हजार ४७७ घनमीटर गाळ आजपर्यंत काढून तो वाहून नेला असल्याने आतापर्यंत या योजनेतून जिल्ह्यातील धरणे व बंधारे यांच्यातील पाणीसाठी ७.५ दलघफूने वाढला आहे.

गंगापूर धरणातील अभियान वादात
नाशिक शहरासाठी पाणी पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका असलेल्या गंगापूर धरणातूनही गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. मात्र, काढण्यात आलेला गाळ केवळ विकासकांनाच दिला जात असल्याचा आरोप करीत गंगावन्हे आणि सावरगावच्या शेतकऱ्यांनी गाळ काढण्याचे काम थांबवले आहे.

मागणी केलेल्या प्रत्येकाला गाळ दिला जात असून, शेतकऱ्यांनाही गाळ दिला असल्याचे जलसमृद्धी फाउंडेशनचे म्हणणे आहे. यामुळे स्थानिक विरुद्ध प्रशासन या पेचात ही मोहीम अडकली आहे.

गंगापूर धरणात साचलेला गाळ काढण्यासाठी १६ एप्रिलपासून 'जलसमृद्ध नाशिक' मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. संबंधितांनी वहनखर्च करणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ ४० ते ५० ट्रक गाळ मिळालेला आहे. उर्वरित सर्व गाळ या परिसरात जमिनी घेतलेल्या विकासकांना दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मोफत गाळा काढण्यासह वहन खर्चही स्वयंसेवी संस्थांनी करावा, अशी मागणी केली जात आहे.

धरणात प्रचंड गाळ आहे. पुढील महिनाभर गाळ काढला तर प्रत्येकाला तो मिळू शकेल. तसेच धरणाची पाणीपातळी वाढविणे हा महत्वाचा उद्देश असल्याने शेतकऱ्यांनी काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे जलसमृद्धी फाउंडेशनचे म्हणणे आहे.