Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : अपघातानंतर नाशिक महापालिकेला जाग; शहरातील 856 होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

टेंडरनामा ब्युरो

Nashik News नाशिक : मुंबई शहरात दोन दिवसांपूर्वी जाहिरात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरातील सर्व ८५६ होर्डिंग धारकांना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वीही महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १६ होर्डिंग कमकुवत असल्याचे आढळून आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर नाशिक शहरातही होर्डिंग कोसळण्याची घटना टाळण्यासाठी महापालिकेकडून दक्षता घेतली आहे. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिराज होर्डिंग उभे असून त्यांची सुरक्षा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोलपंपावर कोसळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४,४०० चौरसफूट आकाराचा होर्डिंग क्षणार्धात कोसळल्याने वाहने आणि शंभराहून अधिक नागरिक त्याखाली अडकले. यात ७४ जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर नाशिक महापालिकेने शहरातील जाहिरात होर्डिंग्जचे नव्याने ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मॉन्सून पूर्व पावसासोबत जोराचे वारे वाहत असल्याने त्यात कमकुवत झालेले जाहिरात होर्डिंग कोसळण्याची शक्यता अधिक असते.
   

नाशिक महापालिका हद्दीत खासगी जागा व मालमत्तांवर महापालिकेच्या कर विभागाकडून ८५६ जाहिरात होर्डिंग्जला परवानगी देण्यात आली आहे. या जाहिरात होर्डिंग्जचे तीन वर्षांतून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे मजबुती प्रमाणपत्र होर्डिंग्जधारकांनी महापालिकेच्या विविध कर विभागाला सादर करणे बंधनकारक आहे.

पुणे शहरात मागील वर्षी होर्डिंग कोसळळे होते. त्यावेळी त्या दुर्घटनेची दखल घेऊन विविध करसंकलन विभागाने खासगी होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते. तसेच अनधिकृत होर्डिंगधारकांवर कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेच्या विविध कर विभागाने दिला आहे.