Nashik News नाशिक : नाशिक शहरासाठी ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी वापरण्यासाठी धरणात चर खोदण्याच्या कामाचे टेंडर (Tender) लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रित सापडले. त्यासाठी महापालिकेने दोनदा स्मरणपत्र पाठवूनही उपयोग झाला नाही.
आता अखेर लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले असून ४ जूननंतर आचारसंहिता शिथील होणार असल्याने त्यानंतरच चर खोदण्याचे टेंडर उघडून उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यानंतर तातडीने ते काम हाती घेतले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांमधून ३१ जुलैपर्यंत ५३०० दलघफू पाणी मंजूर करण्यात आले आहे. नाशिक शहराची वर्षभराची पाण्याची गरज ६१०० दलघफू असल्याचे महापालिकेने जलसंपदा विभागाला कळवूनही त्यांनी ८०० दलघफू पाण्याची कपात केली.
परिणामी ३१ जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरेसे ठरणार नसल्याने महापालिकेने गंगापूर धरणातील ६०० दलघफू मृतसाठ्यातील पाणी उचलण्याची तयारी सुरू केली असून जलसंपदा विभागानेही ते पाणी उचलण्यासाठी चर खोदण्यास परवानगी दिली आहे.
महापालिकेने हे काम जूनपूर्वीच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे टेंडर उघडता येत नसल्याने महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला. महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे तो प्रस्ताव दिला.
सुरवातीला दिलेला प्रस्ताव नगरविकास विभागाकडून गहाळ झाल्याने पुन्हा प्रस्ताव पाठवला. मात्र, लोकसभा निवडणुकीचे नाशिकचे मतदान होऊनही त्याबाबत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे महापालिकेने आता परवानगीची आशा सोडली असून ४ जूनला आचारसंहिता शिथील झाल्यानंतरच टेंडर उघडले जाणार असून त्यानंतर चोर खोदण्याचे कामास सुरवात होणार आहे.
कायमस्वरुपी प्रश्न निकाली काढणार?
जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा न झालेल्या वर्षी गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागते. त्यावर्षी हमखास नाशिक शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी महापालिकेला जलसंपदा विभागाकडून धरणात चर खोदण्यास परवानगी घ्यावी लागते.
या प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून मृतसाठा व महापालिका पाणी पुरवठा होणारी जॅकवेल यांच्यामध्ये असलेला हार्डरॉक (कठीण दगड) कायमचा फोडून मृतसाठ्याचे पाणी विनासायास जॅकवेलपर्यंत आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
यासाठी यावर्षी तो हार्डरॉक तोडण्याचे नियोजन सध्या सुरू असून त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. धरणात पाणी असतानाच हा खडक तोडण्याबाबत चाचपणी सुरू आहे. यासाठी खडकाचे गुणधर्म, मुरुमाची काठिण्य पातळी यांची तपासणी केली जाणार आहे.