Nashik News : नाशिक शहरात स्मार्टसिटी (Smart City Nashik) कंपनीकडून सिग्नल व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) बसवण्याचे काम १५ मे रोजी ते पूर्ण होणार असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सीसीटीव्ही बसवले, तरी त्यासाठी वीजजोडणीचा खर्च कोणी करायचा, यावरून स्मार्टसिटी कंपनी व महापालिका यांच्यात वादाचा मुद्दा बनला आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या कठोर सूचनेनंतर स्मार्टसिटी कंपनीने लोकसभा निवडणुकीपूर्वी सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण केले असले, तरी वीजजोडणी अभावी हे सीसीटीव्ही कार्यान्वित कसे होणार, असा मुद्दा समोर आला आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही बसवल्यानंतर ऑनलाईन चलानद्वारे जमा होणारी दंडाची रक्कम गृहविभागाकडे जात असून त्यातील काही वाटा स्मार्टसिटी कंपनीला दिला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे स्मार्टसिटी कंपनी, महपालिका व पोलिस आयुक्तालयातील असमन्वय यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी पूर सेंसर उभारण्यात येणार आहे.
केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम अंतिम टप्प्यात असून १५ मे रोजी ते पूर्ण होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ई-चलनाद्वारे दंडात्मक आकारणी केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ई-चलनाद्वारे दंडात्मक आकारणी केल्यानंतर तो निधी थेट गृहविभागच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्याचा शब्द कंपनीने पूर्ण केला असून आता या प्रकल्पाच्या हस्तांतरणाचा व तत्पूर्वी सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी वीजजोडणीचा प्रश्न उद्भवला आहे.
महापालिकेने हा प्रकल्प हस्तांतरित करून घेतला नाही व त्या प्रकल्पासाठी वीजजोडणी केली नाही, तर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कशी सुरू होणार, असा नवीन पेच निर्माण झाला आहे. यामुळे हा पेच सुटल्याशिवाय शहरातील सीसीटीव्ही सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे असणार सीसीटीव्हीचे जाळे
सीसीटीव्ही बसवण्यासाठी शहरातील ३७१ ठिकाणे निश्चित केली असून, तेथे ७१२ फिक्स बॉक्स कॅमेरे तर ८८ झूम कॅमेरे बसवले जाणार आहे. यातही १५९ ठिकाणी २७८ फिक्स बॉस कॅमेरा इतर ३४ ठिकाणी पॉईंट झूम कॅमेरे बसवण्यात आले आहे.
त्यादृष्टीने शहर शहर पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत तळमजल्यावर जून २०२३ मध्ये नियंत्रण कक्ष 'अपडेट' करण्यात आला असून, तिथे शहरातील न सर्व सीसीटीव्हींचा एकत्रित 'फीड' उपलब्ध असणार आहे. जवळपास ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.