नाशिक (Nashik) : वेगवान प्रगतीला कारणीभूत ठरणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गाचे (Mumbai Agra Highway) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ते गोंदे दरम्यान सहापदरी विस्तारीकरण करणे, तसेच या महामार्गावरून समृद्धी महमार्गाला जोडण्यासाठी गोंदे ते पिंप्रीसदो दरम्यान २० किलोमीटरच्या सहापदरी काँक्रिटीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (NHAI) १०२५ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे.
यात पिंपळगाव बसवंत ते गोंदे या ६० किलोमीटर रस्त्यासाठी २७५ कोटी रुपये व गोंदेपासून पिंपरी सदो हे समृद्धी महामार्गाला जोडणारे 20 किलोमीटर काँक्रिटच्या सहापदरी महामार्गासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पिंपळगाव बसवंत ते गोंदे दरम्यान सहापदरीकरण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढणार असून, समृद्धीला जोडणाऱ्या मार्गामुळे मुंबई ते नाशिक अंतर अवघ्या दोन तासांचे होऊ शकणार आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव व इगतपुरी तालुक्यातील गोंदे या दरम्यान वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. या महामार्गावरून या भागातून तासाला १६० अवजड वाहने जातात. मुंबई ते धुळे या दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची सर्वाधिक गर्दी असते. तसेच या महामार्गावरून नाशिक शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी असल्याने वाहतूक ठप्प होणे, वायू व ध्वनिप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग विस्तारीकरणाबरोबरच नवीन महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
यात राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव ते गोंदे या ६० किलोमीटर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी २७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या ६० किलोमीटर परिसरात महामार्गाचे ठिकाणी डांबरीकरणाऐवजी वरचा थर काँक्रिटचा केला जाणार आहे. यामुळे या भागात पावसाळ्यात पडत असलेल्या खड्ड्यांपासून मुक्तता होऊ शकणार आहे.
नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी केवळ २०० किलोमीटरसाठी सध्या पाच तास लागतात. यामुळे नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी समृद्धी महामार्ग अत्यंत सोईचा आहे. मात्र, नेमके या महामार्गाचे इगतपुरीपासून पुढचे काम अपूर्ण आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होणे व समृद्धीला जोडण्यासाठीच्या मार्गाची नाशिककरांना प्रतीक्षा आहे. समृद्धीचा इगतपुरी आसनगावपर्यंतचा टप्पा यावर्षी खुला होत आहे. तसेच पुढच्या टप्प्यात अंतिम टप्पाही पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
तोपर्यंत २० किलोमीटरचा गोंदे ते पिंप्रीसदो मार्ग पूर्ण झाल्यास नाशिककरांना तेथून अवघ्या दीड तासात मुंबई गाठता येणार आहे. या २० किलोमीटरच्या सहा पदरी काँक्रिटच्या महामार्गामुळे नाशिक ते समृद्धी इंटरचेंजपर्यंतचे अंतर अर्धा तासात येणार असल्याने नाशिक-मुंबईचे अंतर देखील दोन तासांवर येईल.