Collector Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिकचा GDP 5 वर्षांत होणार पावणेतीन लाख कोटी; जिल्ह्याच्या विकास आराखड्यात नेमकं काय?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्याचे सकल उत्पादन (GDP) एक लाख ३६ हजार कोटींवरून पुढील पाच वर्षांत दोन लाख ७५ हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असलेला आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. ६) राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासमोर सादर केला आहे.

यात खासगी व सरकारी गुंतवणुकीच्या अनेक योजना असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष निर्यात, शक्ती-भक्ती-मुक्ती मार्ग, सिंहस्थ परिक्रमा मार्ग, जिल्ह्यातील तीन प्रमुख नदीजोड प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) च्या माध्यमातून साधारणत: २१ हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील पाच वर्षात होणार असल्याचे गृहित धरले आहे.

राज्य सरकारने २०२७-२८ पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी एक लाख कोटी डॉलर म्हणजे ८२ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्येक जिल्ह्याला त्यांचा जीडीपी वाढवण्यासंदर्भात विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मागील वर्षी दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात कृषी, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून नाशिकचे सकल उत्पादन कसे वाढू शकते, याचा विचार करून जिल्हा नियोजन समितीने जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यात २०२७-२८ या पर्यंत म्हणजे पाच वर्षांत जिल्ह्याचे सकल उत्पादन पावणेतीन लाख कोटींपर्यत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीसमोर ठेवला होता. त्यानंतर आराखडा अंतिम करून त्याचे सादरीकरण बुधवारी (ता. ६)  मुख्य सचिवांसमोर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, टीसीएस कंपनीचे संदीप शिंदे, मी नाशिककरचे संजय कोठेकर यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

नैसर्गिक संपदा लाभलेल्या नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटन, औषधनिर्मिती, वाईन, डिफेन्स हब आणि इलेक्ट्रॉनिक हब उभारण्याच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात आला. रिलायन्स कंपनीने लाईफ केअर क्षेत्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे या उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच एचएएल या कारखान्यात प्रवासी वाहतूक विमानांची दुरुस्ती होणार असल्याने या क्षेत्राशी निगडीत उद्योगांना चालना मिळेल.

याशिवाय शक्ती (सप्तशृंगी गड), मुक्ती (त्र्यंबकेश्वर) आणि भक्ती (शिर्डी) या तीन धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी १६० किलो मिटरचा रिंगरोड अपेक्षित आहे. तसेच ५६ किलोमीटच्या सिंहस्थ परिक्रमा मार्गाचाही त्यात समावेश आहे. याशिवाय दमणगंगा-वाघाड, व वैतरणा-कडवा-दे नदीजोड प्रकल्प, कृषी पर्यटनाचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

नाशिकच्या फिल्म सिटीला बुस्ट
मुंबईतील फिल्म सिटीचा भार हलका करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मुंढेगावला (ता.इगतपुरी) फिल्म सिटी उभारण्याचा मानस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित असला तरी त्याचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात केल्यामुळे या गोष्टीला पुन्हा चालना मिळाली आहे.

क्षेत्रनिहाय अपेक्षित गुंतवणूक
- द्राक्ष निर्यात व ब्रॅण्डिंग : ११०० कोटी
- शक्ती-भक्ती-मुक्ती मार्ग व सिंहस्थ परीक्रमा मार्ग : १० हजार कोटी
- एकदरे-वाघाड-नदीजोड : २९०० कोटी
- वैतरणा-कडवा-देवनदीजोड प्रकल्प : ६७०० कोटी