नाशिक (Nashik) : जलसंपदा विभागाने बिगर सिंचनासाठी पाणी वापराचे दर वाढवले आहे. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वर्षाला ६६.५४ कोटींची तूट होत आहे. यामुळे महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत जवळपास दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी ही वाढ होणार असल्याने पुढच्या चार वर्षांत ही वाढ जवळपास तिप्पट होणार आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हा दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यास नाशिककरांना हजार लिटर पाण्यासाठी ५ रुपयांऐवजी ११ रुपये मोजावेलागणार आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने पुढील चार वर्षांत नागरिकांना हजार लिटर पाण्यासाठी १४ रुपये द्यावे लागणार आहेत.
याशिवाय मलनिस्सारण व्यवस्थेसाठी प्रती हजार लिटरमागे तीन रुपये कर आकारला जाणार असून यात प्रतीवर्षी दर हजार लिटरमागे ५० पैशांची वाढ केली जाणार आहे. यामुळे यापुढे नाशिककरांना हजार लिटर पाणी वापरासाठी १४ रुपये मोजावे लागणार आहेत.
नाशिक महापालिका गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून रोज ५४८ दशलक्ष लिटर पाणी उचलते. शुध्दीकरणाच्या प्रक्रियेअंती नाशिककरांना ४३८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात यापैकी केवळ २९७ दशलक्ष लिटर पाण्याचीच पाणीपट्टी आकारली जाते. उर्वरित पाणी गळती होते, असे दाखवले जाते.
महापालिकेचा पाणीपुरवठ्यावर वार्षिक १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे केवळ ६४ कोटी रुपये महसूल मिळतो. यामुळे दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थापनातून ६६.५४ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीच्या दरात तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायीसमितीच्या मान्यतेसाठी सादर केलाआहे. ही दरवाढ १ डिसेंबर २०२३ पासून लागू होणार आहे. प्रस्तावित दरवाढ लागू झाल्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षात महापालिकेला १४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल.
मलजल उपभोक्ता शुल्कवाढ
मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्च वसूल करण्यासाठी महापालिकेने मलजल उपभोक्ता शुल्क लागू करण्यांचा प्रस्तावही स्थायी समितीवर ठेवला आहे. मलनिस्सारण व्यवस्थेवर महापालिकेला सध्या प्रति हजार लिटर सांडपाण्यावर २.७७ रुपये खर्च येत आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी 'मलजल उपभोक्ता शुल्क' नावाने नवीन कर आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्यानुसार २०२३-२४ या वर्षाकरिता ३ रुपये प्रति हजार लिटर आकारणी केली जाणार असून या करात दरवर्षी प्रति हजार लिटरमागे ५०पैसे वाढवले जाणार आहेत.
अशी वाढणार पाणीपट्टी (हजार लिटर साठी)
- सद्यस्थितीत ५ रुपये
- १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ : ११ रुपये
- २०२४-२५ : १२ रुपये
- २०२५-२६ : १३ रुपये
- २०२६-२७ :१४ रुपये
- बिगर घरगुती सध्या : २२ रुपये
- १ डिसेंबरनंतर : २९ ते ३५ रुपये