Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक मनपाचा टोल फ्री नंबर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील डेब्रीज म्हणजेच बांधकामाचे टाकाऊ साहित्य नेऊन त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने आता टोल फ्री नंबरवरून सशुल्क सेवा सुरू केली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे.

स्वच्छ शहर सर्वेक्षणात दोन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने डेब्रीजची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावल्याने गुण कमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने बांधकामाचे टाकाऊ साहित्य विल्हेवाट लावण्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यातूनच अशा साहित्यातून पर्यायी उत्पादने तयार करण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार सुमारे सात कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करून यासाठी टेंडर सुद्धा मागवले होते. सुरवातीला पाथर्डी शिवारात हा प्रकल्प होणार होता. मात्र, तेथे जागा कमी असल्याने पेठ रोड भागात प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, तेथेही स्थानिक नागरिक आणि विशेष करून राजकीय नेत्यांनी त्यास कडाडून विरोध केला. यामुळे सध्या तो प्रकल्प बारगळला आहे. पण तूर्तास डेब्रिजचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने टोल फ्री सेवा सुरू केली आहे.

सशुल्क सेवा

छोटे विकासक किंवा नागरिक यांच्यासमोर आधीचे घर अथवा इमारत यांची मोडतोड केल्यानंतर डेब्रीजचे काय कराचये, असा प्रश्न पडतो. बऱ्याचदा एखाद्या वाहतूकदाराला सांगितले जाते. यात वाहतूकदार बेकायदेशीरपणे रस्त्याच्या कडेला कुठे तरी निर्जनस्थळी कचरा टाकून देतो. यात महापालिकेने चौकशी केल्यास दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांना डेब्रिज विल्हेवाटीची समस्या भेडसावू नये, यासाठी टोल फ्री नंबरवर कळवल्यास असे डेब्रीज नेण्याची सशुक्ल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे घन कचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.