Dr. Pulkunwar Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा जाहिरात शुल्कातून कमावणार दहा कोटी रुपये

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका हद्दीत लावले जाणारे विविध होर्डिंग, भित्तीचित्रे, डिजीटल बोर्ड, कमानी आदी बाबींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या परवाना शुल्कात चार पट वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच प्रत्येक तीन वर्षांनी या दरात १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे प्रशासकीय कारकीर्दीच्या काळात उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. त्यातूनच जाहिरात परवाना शुल्कात वाढ करण्यात आली असून, या वाढीमुळे महापालिकेला दरवर्षी दहा कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा आहे.

महापालिका हद्दीमध्ये जाहिरात करण्यासाठी महापालिकेकडून परवाना दिला जातो. सध्याच्या दरानुसार प्रतिचौरस फुटासाठी २० रुपये, असा दरवर्षाचा परवाना दर आहे. स्थायी समितीने २००८ मध्ये महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी जाहिरात कर आकारणीचा निर्णय घेतला व तेव्हापासून परवाना दर तेच आहेत. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी नवनवीन मार्गांचा शोध घेतला जात आहे. त्यातून १४ वर्षे स्थिर असलेले जाहिरात परवाना दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत शहरातील १२९ ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांकडून दरवर्षी प्रतिचौरस फूट ६० रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. शहरातील खासगी जागांवर लावण्यात आलेल्या आकाशचिन्ह, फलक यांच्यासाठी प्रतिचौरस फूट साडेपाच रुपये प्रतिमहिना आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

जाहिरात फलकांप्रमाणे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी वाहने, हवेत सोडलेले फुगे, सायकल, घोडा, बैल आदींच्या माध्यमातूनही जाहिरात केली जाते. यामुळे या घटकांच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठीही परवाना बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात वेगवेगळ्या संस्था, राजकीय पक्ष यांच्याकडून महापालिकेच्या जागांवर, खांबांवर ध्वज लावले जातात. त्यावरही कर आकारणी केली जाणार असून, पाच फूट उंचीच्या आतील ध्वजांवर आता १२ रुपये प्रतिदिवस असा कर आकारला जाणार आहे. यापूर्वी हा दर प्रतिदिन दहा रुपये होता. हवेत फुगे सोडून केल्या जाणाऱ्या जाहिरातीसाठी परवाना शुल्कात वाढ करून प्रतिचौरस फुटासाठी प्रतिदिन १५ रुपये आकारले जाणार आहेत. तात्पुरत्या कमानीवर प्रतिचौरस फुटासाठीचे दर १५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहेत.

वाहनांच्या माध्यमातून जाहिरात करताना प्रकाश योजना नसलेल्या वाहनांसाठी पाच रुपये प्रतिदिन प्रतिचौरस फूट व प्रकाश योजना असलेल्या वाहनांसाठी साडे सहा रुपये प्रतिदिन प्रतिचौरस फूट अशी दर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राणी जुंपलेल्या वाहनांवर साडेचार रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिन असे शुल्क आकारले जाणार आहे. या वाढीव दरामुळे महापालिकेला दरवर्षी दहा कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

जाहिरात फलकांचे नवे दर
दहा बाय दहा फूट फलक परवाना शुल्क : १६,८०० रुपये
वीस बाय वीस फूट फलक परवाना शुल्क : ३३,६०० रुपये
३० बाय १५ फूट फलक परवाना शुल्क :  ३७,८०० रुपये
६० बाय २० फूट फलक परवाना शुल्क : १,००,८०० रुपये