नाशिक (Nashik) : बोनससह थकीत वेतनाची मागणी करत सिटी लिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे दोन दिवस शहरातील बस वाहतूकसेवा ठप्प होती. दरम्यान महापालिकेने ठेकेदाराला ५६ लाख रुपये दिल्यामुळे त्याने वाहकाना दोन वर्षांचा बोनस दिल्याने त्यांनी गुरुवारी (दि. २४) सायंकाळी संप मागे घेतला. परिणामी रात्री ८ ला सिटी लिंकची बससेवा सेवा सुरू झाली. दरम्यान यापुढे संप झाल्यास ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
वाहकानी संप पुकारल्यामुळे शहरात पाथर्डी शिवारात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. यामुळे संप मिटल्यानंतर सुरुवातीला शिवमहापुराण कथास्थळी २० बसेस सुरू करण्यात आल्या. दरम्यान शुक्रवारी(दि.२४) सिटी लिंक सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. वाहिकांच्या दोन दिवसांच्या संपामुळे मात्र २९६० फेऱ्या रद्द होत महापालिकेचे ५० लाख रुपयांचे उत्पन्न बुडले आहे. सिटी लिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांत सहा संप केले आहेत. या संपामुळे विद्यार्थी, कामगारासह सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला. कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत तपोवन डेपोचे गेट उघडले जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने एकही बस बाहेर पडली नाही. पैसे खात्यावर जमा होणार नाही तेव्हापर्यंत संप कामय ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. अखेरीस महापालिकेने विशेष बाब म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ठेकेदाराला ५६ लाख रुपये गुरुवारी अदा करत तत्काळ बस सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रात्री आठला श्री शिवमहापुराण कथास्थळाकडे २० बस सोडण्यात आल्या, त्यानंतर टप्याटप्याने सिटी लिंक सेवा मार्गावर आली.
सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी विशेष बाब म्हणून पालिकेकडून ५६ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यानंतर गुरुवारी सायंकाळीसंप मागे घेण्यात आला. यानंतर मात्र कर्मचाऱ्यांचा संप झाला तर संबंधीत ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार असल्याचे सिटीलिंकचे व्यवस्थापक मलिंद बंड यांनी म्हटले आहे. यामुळे महापालिकेने सिटीलिंक संपप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. संप मिटवण्यासाठी महापालिकेने आगाऊ रक्कम ठेकेदाराला दिली असल्याने पुढील महिन्यात वेतन देण्यासाठी ठेकेदाराला त्याची स्वतःची रक्कम वापरावी लागणार असल्याने पुन्हा पेच निर्माण होऊ शकतो.