नाशिक (Nashik) : महापालिकेने येथे २०२७-२८ या वर्षी होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांकडून कामांची यादी मागवून जवळपास दहा त बारा हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील कामांचे आराखडे तयार करून त्यांना मंजुरी मिळवणे व केंद्र - राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी महापालिकेने सल्लागार संस्था नेमण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केल्यानंतर त्याबाबतचा पाठपुरावा संबंधित संस्था करते, त्याप्रमाणे महापालिकेच्या सर्व विभागांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रयत्न करण्यापेक्षा सल्लागार संस्थेकडे ती जबाबदारी सोपवल्यास समन्वय साधणे सोपे होणार असल्याचे प्रशासनाला वाटत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरावर सिंहस्थ समितीची स्थापना होते. त्यानंतर जिल्हा स्तरावर व नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर पालिकास्तरावर सिंहस्थ समितीची स्थापना केली जाते. नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकास्तरावरील सिंहस्थ सिमितीने प्रस्तावित केलेली कामे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय समितीकडे पाठवली जातात.
दरम्यान सिंहस्थास आता केवळ साडेतीन वर्षे उरले असून अद्याप जिल्हा व राज्यस्तरावरून कोणतीही हालचाल नसताना नाशिक महापालिकेने विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार सिंहस्थ समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीने महापालिकेच्या सर्व ४३ विभागांकडून कामांची यादी मागवून जवळपास दहा ते बारा हजार कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे.
सिंहस्थातील कामांची जंत्री मोठी असल्याने या आराखड्यात परिपूर्णता असणे आवश्यक आहे. या आराखड्यातील प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, त्या अंदाजपत्रकास मान्यता घेणे, निधीसाठी राज्य अथवा केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे ही कामे महापालिकेच्या प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे करावी लागणार आहेत. यामुळे प्रत्येक विभागाचा वेळ त्यात जाऊन महापालिकेची दैनंदिन स्वरुपाच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातच सिंहस्थ समन्वय समितीच्या प्रमुखांना या प्रत्येक विभागाकडून स्वतंत्रपणे आढावा घेण्यासाठी वेळ जाणार आहे.
यावर उपाय म्हणून महापालिकेने या संपूर्ण आराखड्यात समाविष्ट केलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, त्या अंदाजपत्रकांना मान्यता घेणे व सरकारी पातळीवरून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे या कामांसाठी सल्लागार संस्था नेमण्याचा विचार केला असून त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
महापालिकेने यापूर्वी नमामि गोदा प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी घेणे व केंद्र सरकारकडून निधी मिळवणे यासाठी आराखडा अलमोण्डझ ग्लोबल सिक्युरिटिझ या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नमामि गोदा प्रकल्पाबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असून, महापालिका केवळ संबंधित कंपनीकडून माहिती घेत असते. त्याचपद्धतीने सिंहस्थातील सर्व कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व त्यास मान्यता घेणे व त्यासाठी निधी मिळवणे ही जबाबदारी देण्यासाठी महापालिका प्रशासन सल्लागार संस्था नेमण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत व मलनिस्सारण या विभागांचा यासाठी अभिप्राय मागवला जाणार असून त्यानंतर सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. नमामी गोदाचा आराखडा तयार करणारी अलमोण्डझ ग्लोबल सिक्युरिटिज प्रा.लि. या कंपनीचे नाव रेसमध्ये आघाडीवर आहे. या कंपनीने महापालिकेला पत्र पाठवत सिंहस्थ आराखड्यासाठी सल्लागार होण्याची तयारी दर्शवली आहे.