citylink Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : ‘सिटीलिंक’च्या संपाला कंटाळलेली महापालिका वाहक पुरवठादाराचा ठेकाच रद्द करणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने वेतनासाठी डिसेंबरचे आगाऊ देयक अदा करूनही ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकविल्याने सिटीलिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला आहे. सिटीलिंक बससेवा सुरू झाल्यापासून साडेती वर्षांमध्ये आतापर्यंतचा हा आठवा संप असल्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने अखेर मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज' या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी तिसरी व अंतिम नोटीस पाठवली आहे. यामुळे या वाहक पुरवत असलेल्या ठेकेदाराचा ठेक्का रद्द होणार असल्याचे मानले जात आहे.

सिटीलिंक बससेवा चालवण्यासाठी महापालिकेने तपोवन व नाशिकरोड असे दोन बसडेपो तयार केले आहेत. त्यात तपोवन डेपोतील बसेससाठी वाहक पुरवत असलेला मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज' या दिल्लीस्थित ठेकेदार वाहकांचे वेतन वेळेवर देत नसल्यामुळे वाहक अचानकपणे संप पुकारत असतात. यापूर्वी तपोवन डेपोसाठी वाहक पुरवत असलेल्या ठेकेदाराकडेच नाशिकरोड डेपोतील बसेससाठी वाहक पुरवण्याची जबाबदारी होती. यामुळे या वाहकांनी संप पुकारल्यानंतर एकाचवेळी संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प होत होती. महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाने मागील महिन्यातच नाशिकरोड डेपोच्या बसेसला वाहक पुरवण्यासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. दरम्यान तपोवन बस डेपोतील वाहकांच्या संपामुळे सिटीलिंकच्या सुमारे दीडशे बस या डेपोतून बाहेरच न पडल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला, नाशिकरोड डेपोतील शंभर बसची सेवा सुरू असली, तरी या स्थानकातून नेहमी सुटणाऱ्या बसची संख्या घटल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. गुरुवारी ठेकेदार, वाहक आणि सिटीलिंकमध्ये तोडगा न निघाल्यान शुक्रवारीही संप सुरूच होता. यामुळे शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

सिटीलिंकसाठी वाहक पुरवठादार 'मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज' या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युईटी व भविष्यनिर्वाह निधी रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांनी आतापर्यंत आठ वेळा संप पुकारला आहे. आता पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे डिसेंबरपासूनचे वेतन अदा केलेले नाहीत्यामुळे वाहकांना उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. सिटीलिंकचे सीईओ तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी ठेकेदाराला पाचारण करीत गुरुवारी त्यांच्याशी चर्चा केली. ठेकेदाराला डिसेंबरचे वेतन देऊनही त्याने ते वाहकांना दिले नाहीच, उलट महापालिकेकडे जानेवारीचे वेतन मागितले. मात्र, आधी वाहकांचे वेतन द्या आणि त्याचे पुरावे सादर केल्यानंतर जानेवारीचे वेतन देऊ, अशी भूमिका महापालिकेने घेतली. यामुळे चर्चेतून तोडगा निघाला नाही. यामुळे महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक कंपनीने संबंधित ठेकेदाराला तिसऱ्यांदा अंतिम 'टर्मिनेशन'ची नोटीस बजावली आहे. आतापर्यंत तीन नोटिसा देण्यात आल्यामुळे पालिकेकडून कधीही सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.