Job Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : महापालिकेतील भरती प्रक्रियेचे एक पाऊल पुढे; टीसीएसने मागवली आरक्षणाची माहिती

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मागील दीड वर्षापासून होणार होणार म्हणून चर्चेत असलेल्या  महापालिकेतील आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीसाठी 'टीसीएस' या कंपीने महापालिकेकडून रिक्तपदासह आरक्षणाची माहिती मागवली आहे. यामळे आता भरतीबाबत एक पाऊल पुढे पडल्याने मानले जातआहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने डिसेंबरअखेर रिक्तपदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भरती प्रक्रिया राबवल्यानंतर पुढील वर्षात या दोन्ही विभागांचा कामकाजाचा भार कमी होणार आहे.

नाशिक महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला 'ब' वर्ग दर्जा मिळाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या सुधारित आराखड्यानुसार १४००० पदांचा सुधारित आराखडा तयार केला असला, तरी या आराखड्यास अद्याप नगरविकास विभागाने मंजुरी दिलेली नाही. नियमित महसुली व प्रशासकीय खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास पद भरतीव बंदी आहे. याचा फटका नाशिक महापालिकेला बसला आहे. कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून आरोग्य विभागातील ३५८ व  व अग्निशमन विभागातील ३४८ अशी ७०६ पदे पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र, भरती करताना शासन नियुक्त संस्थेमार्फत भरती कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार टीसीएस कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे.

याबाबत टीसीएससोबत करार करण्यात आला असून भरतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे प्रोजेक्ट मॅनेजरकडून काम पूर्ण करण्यात आले. आगामी तीन वर्षासाठी करार असून आता कुठलीही भरती टीसीएसमार्फतच केली जाणार आहे. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दहा हजारापर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे. दहा हजार ते पत्रास हजार परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखांपर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये असा दर आकारला जाईल दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे. महापालिकेतील ड, क व ब संवर्गातील पदांची भरती टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता उर्वरित ६२४ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीसाठी लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी संवर्गनिहाय परिक्षेचे स्वरूप, संवर्ग, आरक्षण यासंदर्भात टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींची प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती घेण्यात आली.