नाशिक (Nashik) : क्रिसिल या आर्थिक पत निर्देशांक संस्थेने नाशिक महापालिकेला अ-अ श्रेणीचा पत दर्जा दिला आहे. महापालिका मागील बारा वर्षे या श्रेणीत असल्यामुळे महापालिकेला या आधारे ५०० कोटी रुपये कर्ज मिळू शकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी सिहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेने नमामी गोदा, गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजना, दारणा धरण थेट पाइपलाइन योजना, मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण, पाणीपुरवठा योजनांच्या वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण आदींसाठी निधी मागितला असून त्यात पालिकेला साधारण २५ टक्के हिस्सा खर्च करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेकडून कर्ज उभारणीची चाचपणी सुरूअसून क्रिसीलच्या रेटिंगमुळे ५०० कोटींचे कर्ज मिळू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता असताना २०२१-२२ या आर्थिक वर्षापर्यंत महापालिकेत २८०० कोटींचे दायीत्व निर्माण झाले होते. महापालिकेन मार्च २०२२ पासून प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी अनावश्यक उड्डाणपुलांसह दायीत्व वाढवणारे अनेक कामे रद्द केले असून दायीत्वाची रक्कम आता हजार कोटींपर्यंत खाली आली आहे. दरम्यान महापालिकेच्या प्रशासनाने आता, २०२७-२८ मधील कुंभमेळ्यासाठी विकासकामांचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असून त्या आराखड्यातील कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधीची मागणी केली जाणार आहे.
या प्रारुप आराखड्यातील कामांसाठी किमान आठ हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता असून त्यासाठी महापालिकेला किमान दोन हजार कोटींचा स्वहिस्सा भरावा लागणार आहे. महापालिकेकडील दायीत्व व उत्पन्न याचा विचा करता एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी महापालिकेला कर्जरोख्यांशिवाय पर्याय दिसत नाही. यामुळे महापालिकेने क्रिसील या संस्थेकडून पतमूल्यांकन करून घेतले आहे. क्रिसिल या संस्थेने अ- अ दर्जा श्रेणी दिले असून त्या माध्यमातून ५०० कोटींचे कर्जरोखे उभारता येऊ शकतात. मागील सिंहस्थात महापालिकेने ४५० कोटींचे कर्जरोखे उभारले होते. ते कर्जाची तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकाळात परतफेड करण्यात आली.